भारत व पाकिस्तान यांच्यात राजकीय मतभेद असले, तरी क्रीडा क्षेत्रात त्याची गल्लत करणे अयोग्य आहे. उभय देशांमधील क्रीडा संबंध सुरू ठेवले पाहिजेत, असे मत जागतिक बिलियर्ड्स विजेता खेळाडू पंकज अडवाणीने व्यक्त केले.पंकजने कराची येथे नुकत्याच झालेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. पंकज याने सांगितले की, ‘‘भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रीडा व सांस्कृतिक देवाणघेवाण रोखणे अयोग्य होईल. उलट या क्षेत्रांमुळेच उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील. जरी कोणत्याही खेळांमधील लढतीत उभय देशांचे खेळाडू त्वेषाने खेळत असले, तरी मैदानाबाहेर त्यांच्यात अतिशय चांगले मित्रत्वाचे नाते असते. कराची येथे नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेच्या वेळी आमच्यासाठी खूप चांगली सुरक्षा व्यवस्था होती. त्यांनी आमचे चांगल्या रीतीने आदरातिथ्य ठेवले होते.’’आशियाई बिलियर्ड्स विजेता सौरव कोठारी, तसेच विद्या पिल्ले व चित्रा मागिमैराज यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती मात्र त्यांना हा पुरस्कार मिळू शकला नाही. त्याबाबत पंकज म्हणाला की, ‘‘या तीनही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी ऑलिम्पिक पदकाइतकी आहे. आमचा खेळ जरी बिगर ऑलिम्पिक खेळ असला, तरी जागतिक स्तरावर या खेळास खूप उच्च स्थान आहे. आम्हालाही जागतिक स्तरावर विजेतेपद मिळविण्यासाठी खूप वर्षांची तपश्चर्या करावी लागते, अनेक वर्षे संघर्ष करावा लागतो. त्यामुळे आमच्या खेळास शासकीय स्तरावर दुय्यम लेखणे अयोग्य होईल.’’तो पुढे म्हणाला की, ‘‘ऑलिम्पिक पदक व्यासपीठ या शासकीय योजनेचा फायदा स्नूकर किंवा बिलियर्ड्सच्या खेळाडूंनाही मिळाला पाहिजे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. अनेक संस्थांकडून त्यांना आर्थिक साहाय्य मिळत आहे. आमच्या खेळात जागतिक स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी खूप आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळेच शासनाने आमच्या खेळात करिअर करणाऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे.’’
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2015 रोजी प्रकाशित
राजकारण व क्रीडा क्षेत्राची गल्लत करणे अयोग्य – पंकज अडवाणी
भारत व पाकिस्तान यांच्यात राजकीय मतभेद असले, तरी क्रीडा क्षेत्रात त्याची गल्लत करणे अयोग्य आहे. उभय देशांमधील क्रीडा संबंध सुरू ठेवले पाहिजेत...
First published on: 24-08-2015 at 12:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont mix up game and pilitics