राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह पाटील यांचे स्पष्टीकरण; भोईर यांच्या अध्यक्षतेखालील शिस्तपालन समितीकडून चौकशी

सामन्यांची रणनीती चुकली आणि महाराष्ट्राला या मूर्खपणामुळे राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेच्या साखळीतच गारद होण्याची नामुष्की सहन करावी लागली. दोष कुणाचा, जबाबदार कोण, याचा विचार करण्यापेक्षा हे सारे अपघाताने घडले. पुढील स्पर्धेत असे होणार नाही, याची काळजी घेऊ, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी केले. या घटनेची चौकशी संघटनेचे उपाध्यक्ष देवराम भोईर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिस्तपालन समितीमार्फत करण्यात येईल, असे जाहीर केले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झालेल्या कबड्डी दिनाच्या वार्षिक कार्यक्रमात पाटील म्हणाले की, ‘‘राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूकरिता कार्यकारिणी समितीने दडपण आणले नाही. निवड समितीला संघनिवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. आता साखळीत संघाचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे फेडरेशन चषक स्पर्धा खेळता येणार नाही. याचप्रमाणे भारतीय संघात स्थान मिळवता येणार नाही. मात्र या अपयशातून धडा घेत येत्या हंगामात सर्व गटांच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा एप्रिल महिन्याच्या आतच संपवणार आहोत.’’

राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत. बँका, सरकारी-निमसरकारी आस्थापने, तेल व विमा कंपन्यांत खेळाडू भरतीकरिता जोमाने प्रयत्न करेन, असे आश्वासन राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी दिले. सचिव आस्वाद पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघ साखळीतच गारद झाला याचे दु:ख व्यक्त केले.

खटावकर यांचे मौन

महाराष्ट्राच्या खराब कामगिरीबाबत निवड समिती सदस्या शकुंतला खटावकर यांनी मौन बाळगले आहे. संघनिवड आणि कामगिरीबाबत त्यांना विचारले असता मी यासंदर्भात काहीही बोलणार नाही, असे खटावकर यांनी स्पष्ट केले.

सल्लागार समिती हवी!

वर्षांनुवर्षे कार्यरत असलेले संघटक राष्ट्रीय क्रीडा संहितेचे नियम लावून कार्यकारिणी समितीच्या बाहेर काढणे योग्य नाही. त्यामुळे संघटनेचा कारभार चालणे कठीण होईल. याकरिता ज्येष्ठ संघटकांची सल्लागार समिती संघटनेवर कार्यरत असावी, अशी सूचना आम्ही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कीर्तिकर यांनी व्यक्त केली आहे.