नवी दिल्ली : बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी संकेतस्थळाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डरिंग) प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची ११.१४ कोटी रुपयांची मालमत्ता गुरुवारी जप्त केली.

‘वनएक्सबेट’ नावाच्या ऑनलाइन बेटिंग संकेतस्थळाविरुद्धच्या प्रकरणात शिखर धवनची ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तर रैनाकडून ६.६४ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या दोन्ही क्रिकेटपटूंनी ‘वनएक्सबेट’ आणि त्याच्याशी संबंधित परदेशी संस्थांच्या जाहिरातीसाठी ‘जाणूनबुजून’ करार केल्याचे चौकशीदरम्यान आढळून आले आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने यापूर्वी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्यासारख्या माजी क्रिकेटपटूंचीही चौकशी केली आहे.