England Four Wicket Down and need 98 runs: हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता २७ धावा केल्या होत्या, मात्र चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडचा डाव गडगडला. उपाहारापर्यंत इंग्लंडने १५३ धावांवर ४ विकेट गमावल्या आहेत.

मिचेल स्टार्कने इंग्लंडला दिला पहिला धक्का –

इंग्लंडने चौथ्या दिवसाची सुरुवात २७/० धावसंख्येवरुन पुढे केली. मिचेल स्टार्कने इंग्लंडला पहिला धक्का दिला तेव्हा जॅक क्रॉली आणि बेन डकेटने स्कोअरबोर्डवर अवघ्या १५ धावा केल्या होत्या. स्टार्कने बेन डकेटला एलबीडब्ल्यू आऊट केले. डकेट २३ धावा करून बाद झाला.

५१ धावांत इंग्लंडच्या पडल्या तीन विकेट –

यानंतर १८ धावांतच मोईन अलीच्या रूपाने इंग्लंडला दुसरा धक्का बसला. मोईन अलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून इंग्लंडने एक प्रयोग केला, जो अपयशी ठरला. मोईन अलीची विकेटही मिचेल स्टार्कने घेतली. अली केवळ ५ धावा करून बाद झाला. पहिल्याच सत्रात जॅक क्रॉलीही ४४ धावा करून बाद झाला. मिचेल मार्शने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशाप्रकारे इंग्लंडला ५१ धावांत तीन धक्के बसले.

जो रुटही ठरला अपयशी –

जॅक क्रॉली बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्यातील भागीदारी बहरली, पण १३१ धावांवर जो रूटच्या रूपाने इंग्लंडला चौथा धक्का बसला. रूट २१ धावा करून बाद झाला. ब्रूक आणि रूट यांच्यात ३८ धावांची भागीदारी झाली. जो रुटला पॅट कमिन्सने तंबूत पाठवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंडला विजयासाठी ९८ धावांची गरज –

उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या ४ बाद १५३ अशी आहे. त्यांना विजयासाठी अजून ९८ धावांची गरज आहे. हॅरी ब्रूक (४०) आणि कॅप्टन बेन स्टोक्स (७) ही जोडी क्रीजवर आहे. ऑस्ट्रेलियाकडून चौथ्या डावात मिचेल स्टार्कला दोन तर पॅट कमिन्स आणि मिचेल मार्शला १-१ विकेट मिळाली.