प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिले चारही सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघ शुक्रवारपासून सिडनी येथे होणारा पाचवा सामना जिंकून आपली पत राखण्यासाठी उत्सुक आहे. मात्र फॉर्मात असलेला ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी आतूर असल्यामुळे इंग्लंडसमोर ही मालिका ५-० अशी गमावण्याचे संकट उभे राहिले आहे.
चौथ्या सामन्यात अ‍ॅलिस्टर कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला आठ विकेट्सनी पराभूत व्हावे लागले होते. जर पाचव्या सामन्यातही त्यांना पराभूत व्हावे लागले तर ५-० अशी मालिका गमावणारा हा तिसरा इंग्लिश संघ ठरेल. मालिका सुरू होण्याआधी इंग्लिश संघ जेतेपदासाठी दावेदार समजला जात होता. पण अनुभवी खेळाडू जोनाथन ट्रॉटने मानसिक तणावामुळे घेतलेली माघार, ग्रॅमी स्वानची निवृत्ती, फॉर्मात नसलेले अव्वल खेळाडू तसेच लागोपाठच्या अ‍ॅशेस मालिकांमुळे खेळाडूंवर आलेले मानसिक दडपण (केव्हिन पीटरसनचे मत) ही सर्व कारणे इंग्लंडच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
इंग्लंडने या मालिकेत १५ खेळाडूंना संधी दिली. आता सिडनीतील कसोटीसाठी गॅरी बॅलन्स, स्कॉट बॉर्थविक आणि स्टीव्हन फिन या आणखी तीन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. चारही सामने गमावल्यामुळे कर्णधार कुकवरील दडपण वाढले आहे. ‘‘संघाचा कप्तान या नात्याने इंग्लंडच्या पराभवाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे. या भूमिकेसाठी मी योग्य आहे की नाही, हे मालिका संपल्यावर निवड समितीने ठरवावे. इंग्लंड संघाचे नशीब बदलण्यासाठी मी माझा अनुभव पणाला लावणार आहे,’’ असे कुकने सांगितले.