इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळेचा एक खास विक्रम मोडला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने सलामीवीर केएल राहुलला ८४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. राहुलला माघारी धाडत त्याने कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याच्या विक्रमात कुंबळेला मागे टाकले आहे. कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये १३२ सामन्यांत ६१९ बळी घेतले होते. आता अँडरसनच्या नावावर ६२० बळी जमा झाले आहेत.

जेम्स अँडरसनने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीला बाद करत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने ४१व्या षटकात सलग दोन चेंडूंत या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी अँडरसनने राहुलला बाद केले. त्याने १६३ सामन्यात ६२० बळी घेतले आहेत.

 

जगातील तिसरा सर्वोत्तम गोलंदाज

जेम्स अँडरसन जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज देखील आहे. एकंदरीत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (१३३ कसोटीत ८०० बळी) आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (१४५ कसोटीत ७०८ बळी) यांच्या मागे आहे.

भारताचा पहिला डाव

नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला आहे. भारताकडे आता ९५ धावांची आघाडी आहे. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर  सलामीवीर लोकेश राहुल (८४) आणि मधल्या फळीत रवींद्र जडेजा (५६) यांनी भारताला सावरले. या दोघांनी जोडलेल्या महत्त्वपूर्ण धावांमुळे भारताला पावणेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने ५ आणि अँडरसनने ४ बळी घेतले. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव १८३ धावांवर आटोपला आहे.