मालिका गमावलेल्या इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ३४२ धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. वनडे क्रिकेटमधला हा धावांच्या फरकाने सर्वोत्तम विजय आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४१४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ७२ धावांतच आटोपला.
इंग्लंडला बेन डकेट आणि जेमी स्मिथ यांनी ५९ धावांची खणखणीत सलामी करुन दिली. ३१ धावा करुन डकेट परतला. यानंतर स्मिथला जो रूटची साथ मिळाली. ६२ धावांवर केशव महाराजने स्मिथला बाद केलं. यानंतर रूटने जेकब बेथेलला हाताशी घेत तिसऱ्या विकेटसाठी १४४ चेंडूत १८२ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान बेथेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पहिलंवहिलं शतक झळकावलं. १३ चौकार आणि ३ षटकारांसह ११० धावांची खेळी करून बेथेल बाद झाला. रूटने यानंतर सूत्रं हाती घेत १९वं वनडे शतक पूर्ण केलं. मात्र शतकानंतल लगेचच तो तंबूत परतला. त्याने ६ चौकारांसह १०० धावांची खेळी केली. मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचून मिळालेला असताना अनुभवी जोस बटलरने ३२ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६२ धावांची वेगवान खेळी केली. कर्णधार हॅरी ब्रूक मात्र भोपळाही फोडू शकला नाही. विल जॅक्सने ८ चेंडूत १९ धावा करत बटलरला चांगली साथ दिली. दोन शतकं आणि बटलरच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने चारशे धावांची वेस ओलांडली. दक्षिण आफ्रिकेतर्फे कॉबिन बॉश आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीसमोर एडन मारक्रम, रायन रिकलटन, मॅथ्यू ब्रिजट्स, ट्रिस्टन स्टब्ज हे प्रमुख फलंदाज निष्प्रभ ठरले. दक्षिण आफ्रिकेची स्थिती २४/६ अशी झाली होती. कार्बिन बॉशने २० तर केशव महाराजने १७ धावा करत आफ्रिकेचा सन्मान वाचवला. आर्चरला आदिल रशीद आणि ब्रायडन कार्स यांनी तोलामोलाची साथ दिली. रशीदने १३ धावांत ३ तर कार्सने २ विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा डाव २१ षटकात ७२ धावांतच आटोपला आणि इंग्लंडने विश्वविक्रमी विजयाची नोंद केली. आर्चरने ९ षटकात अवघ्या १८ धावा देत ४ विकेट्स पटकावल्या. यामध्ये ३ निर्धाव षटकांचाही समावेश होता.
संस्मरणीय विजय हे इंग्लंडच्या मालिका पराभवाचं शल्य कमी करणारं होतं. दक्षिण आफ्रिकेने दोन सामने जिंकत मालिका जिंकली होती.