बलाढय़ चेक प्रजासत्ताकविरुद्ध आज लढत

बाकू : पहिल्याच सामन्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अव्वल खेळाडू ख्रिस्तियन एरिक्सन मैदानावरच कोसळल्याचा आघात सहन केल्यानंतर आता डेन्मार्कचा संघ पेटून उठला आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत २००४नंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या डेन्मार्कला आता उपांत्य फेरीचे वेध लागले असून शनिवारी रात्री त्यांची लढत बलाढय़ चेक प्रजासत्ताकशी होणार आहे.

एरिक्सन प्रकरणानंतर साखळी गटात पहिल्या दोन पराभवानंतर डेन्मार्कने रशियाचा ४-१ असा धुव्वा उडवत बाद फेरीतील आव्हान कायम राखले. त्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीत वेल्सला ४-० असे सहज नमवून १९९२च्या युरो चषक विजेत्या डेन्मार्कने दमदार कामगिरीची नोंद केली.

डेन्मार्कचा आघाडीवीर युस्सूफ पोलसेन मांडीच्या स्नायूच्या दुखापतीतून बरा झाला असून चेक प्रजासत्ताकविरुद्ध त्याचा समावेश निश्चित मानला जात आहे. त्याच्या जागी वेल्सविरुद्धच्या सामन्यात संधी मिळालेल्या कास्पेर डोलबर्ग याने दोन गोल झळकावले होते.

दुसरीकडे, चेक प्रजासत्ताकने स्कॉटलंडला २-० असे नमवत युरो चषकाची थाटात सुरुवात केली होती. त्यानंतर क्रोएशियाला बरोबरीत रोखल्यावर त्यांना इंग्लंडकडून ०-१ अशी हार पत्करावी लागली. उपउपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्ससारख्या प्रतिस्पध्र्याचे आव्हान २-० असे संपुष्टात आणल्यानंतर चेक प्रजासत्ताकचे उपांत्यपूर्व लढतीत पारडे जड मानले जात आहे.

चेक प्रजासत्ताकचा आघाडीवीर पॅट्रिक शिक बहरात असून सर्वाधिक गोलच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला (पाच गोल) गाठण्यासाठी त्याला फक्त एका गोलची आवश्यकता आहे. नेदरलँड्सविरुद्ध टोमास होल्स आणि शिक यांनी गोल लगावले होते. चेक प्रजासत्ताकने १९९६मध्ये युरो चषकाचे उपविजेतेपद पटकावले असून २००४मध्ये उपांत्य फेरी गाठली होती.

डेन्मार्कने २००४नंतर पहिल्यांदाच युरो चषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून याआधी त्यांना चेक प्रजासत्ताककडून ०-३ असे पराभूत व्हावे लागले होते.

१३ चेक प्रजासत्ताक आणि डेन्मार्क यांच्यात आतापर्यंत २५ लढती झाल्या असून चेक प्रजासत्ताकने १३ सामने जिंकले आहेत तर डेन्मार्कला अवघे दोन विजय मिळवता आले आहेत.

चेकोस्लोव्हाकियाचा भाग असताना त्यांनी १९७६मध्ये युरो चषकाचे जेतेपद पटकावले आहे. विभक्त झाल्यानंतरच्या पहिल्याच प्रयत्नांत चेक प्रजासत्ताकने १९९६मध्ये युरो चषकाची अंतिम फेरी गाठली होती. त्यात त्यांना जर्मनीकडून २-१ असे पराभूत व्हावे लागले होते.