युक्रेनवर सुरु असलेल्या हल्ल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादले जात आहेत. आता फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने (इंटरनेशनल फेडरेशन ऑफ असोसिएटेड फुटबॉल) रशियावर काही बंधनं लादली आहेत. फिफाने रशियात फुटबॉल सामने खेळण्यावर मनाई केली आहे. तसेच रशियन संघाला तटस्थ ठिकाणी ध्वज आणि राष्ट्रगीताशिवाय सामने खेळण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनमधील परिस्थिती सुधारली नाही तर देशाला स्पर्धेमधून वगळले जाऊ शकते असा इशारा देखील दिला आहे. यासोबतच रशियाने तटस्थ ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामना खेळवला तर चाहत्यांना स्टेडियममध्ये येऊ दिले जाणार नाही, असे फिफाने स्पष्ट केले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणात बळाचा वापर केला, याचा निषेध म्हणून फिफाने हे पाऊल उचललं आहे.

दुसरीकडे, पोलिश फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख सेझारी कुलेझा यांनी फिफाच्या भूमिकेवर टीका केली आणि रशियाला विश्वचषकातून बाहेर काढण्याची मागणी केली. “फिफाचा आजचा निर्णय पूर्णपणे अस्वीकार्य आहे. या खेळात सहभागी होण्यात आम्हाला स्वारस्य नाही. आमची भूमिका कायम आहे. पोलंडचा राष्ट्रीय संघ रशियाशी खेळणार नाही, संघाचे नाव काहीही असले तरीही आमचा हा निर्णय कायम आहे.,” असं त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे. “फिफाचे मानवी हक्क धोरण कागदावर ठेवण्यापेक्षा सत्यात आणणं गरजेचं आहे, आता रशियन फुटबॉल असोसिएशनला २०२२ मध्ये कतार विश्वचषकासाठी पात्र होण्यापासून वगळून ते अंमलात आणण्याची वेळ आली आहे,” असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

पोलंडला २४ मार्च रोजी मॉस्को येथे खेळायचे होते. रशियाने विजय मिळवल्यास २९ मार्च रोजी चेक प्रजासत्ताक आणि स्वीडन यांच्यातील सामन्यातील विजेत्या संघासोबत सामना असणार आहे. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा ड्रॉ कतार येथे होणार आहे. मात्र चेक प्रजासत्ताक आणि स्वीडनने देखील सांगितले आहे की, ते रशिया विरुद्ध खेळणार नाहीत. स्वीडिश फेडरेशनचे अध्यक्ष कार्ल-एरिक निल्सन यांनीही फिफाच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. तीन देशांच्या आक्रमक पवित्र्यामुळे विश्वचषक पात्रता फेरीबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे फिफाने म्हटलं आहे.

Ukraine War: आर्थिक निर्बंधावर मात करण्यासाठी रशिया घेणार बिटकॉइनचा आधार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी यूरो कप २०२० स्पर्धेपूर्वीच याची ठिणगी पडली होती. त्याला युक्रेननं स्पर्धेसाठी जाहीर केलेली जर्सी कारणीभूत ठरली होती. या जर्सीवर असलेली घोषणा आणि नकाशा सध्या वादाचा विषय ठरला होता. युक्रेननं आपल्या जर्सीवर एक नकाशा दाखवला होता. त्यात क्रीमिया आपल्या देशाचा भाग असल्याचं दर्शवण्यात आलं होता. यावर रशियाने यूरो कप आयोजन समितीकडे आपली नाराजी व्यक्त केली होती. क्रीमिया आपल्या देशाच्या अविभाज्य भाग असल्याचं रशियाने सांगितलं होतं. रशियाने जर्सीवरून वादग्रस्त नकाशा आणि घोषणा काढण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आयोजन समितीने याची दखल घेत युक्रेनला हा वादग्रस्त नकाशा काढण्यास सांगितलं होता. २०१४ साली रशियाने क्रीमियावर ताबा मिळवला होता. दुसरीकडे युनाइटेड नेशन क्रीमिया युक्रेनचा भाग असल्याचं सांगत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील वाद मैदानापर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे.