Anshuman Gaekwad Died: क्रिकेटच्या मैदानात परिस्थितीत कितीही विपरीत असली तरी हार न मानणारे भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू-फलंदाज अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी मात्र झुंज अपयशी ठरली. रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटी व १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याशिवाय अंशुमन गायकवाड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक व राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही भूमिका बजावली.
अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनमध्ये गेल्या काही काळापासून रक्ताच्या कर्करोगासाठी उपचार चालू होते. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये त्यांनी उपचार घेतले. गेल्याच महिन्यात ते भारतात परत आले होते. त्यांच्यावरील उपचारांसाठी बीसीसीआयने नुकतीच एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्याशिवाय, १९८३ सालच्या भारतीय विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंनीही उपचारांसाठी त्यांना आर्थिक मदत केली होती.
अंशुमन गायकवाड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. जलदगती गोलंदाजांसमोर पाय रोवून उभे राहात अंशुमन गायकवाड यांनी जगभरातल्या अनेक तेजतर्रार गोलंदाजांचा यशस्वीपणे सामना केला. यामध्ये त्यांनी थेट अंगावर अनेक गोलंदाजांचे वेगवान चेंडू झेलले. यामुळे त्यांना अनेकदा जखमाही झाल्या. पण त्यांचा अभेद्य बचाव भेदणं वेगवान अनेक दिग्गज गोलंदाजांसाठी महाकठीण कर्म ठरलं.
जगभरातल्या जलदगती गोलंदाजांना आस्मान दाखवलं!
अंशुमन गायकवाड हे त्यांच्या अभेद्य बचावासाठी विशेष ओळखले जायचे. आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १५ एकदिवसीय सामने खेळले. या काळात इतर फलंदाजांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या तेजतर्रार गोलंदाजांचा अंशुमन गायकवाड मोठ्या हिकमतीनं सामना करायचे. ४० कसोटी, अवघी २ शतकं आणि ३०च्या थोडी जास्त असणारी धावांची सरासरी ही त्यांच्या समकालीन फलंदाजांच्या तुलनेत फारशी चमकदार आकडेवारी खचितच नाही. पण त्यांच्या अविस्मरणीय खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमच्या कोरल्या गेल्या. विशेषत: १९८३ साली पाकिस्तानविरुद्ध जलंधरमध्ये त्यांनी फटकावलेलं कारकिर्दीतलं पहिलं-वहिलं व एकमेव द्विशतक!
अंशुमन गायकवाड यांनी त्या कसोटीमध्ये अक्षरश: खेळपट्टीवर तंबू ठोकला होता. त्यांची ही खेळी तब्बल ६७१ मिनिटं चालली. त्या काळी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हे सर्वात संथगतीचं द्विशतक ठरलं होतं. एकीकडे पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर गायकवाड यांनी केलेली ही खेळी जशी कायमची स्मरणात राहिली, तशीच कानपूरमध्ये १९७९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्यांनी झळकावलेलं शतक विशेष ठरलं. हे शतक विशेष ठरलं कारण ते ऐन भरात असणाऱ्या तरुण आणि तिखट मारा करणाऱ्या माल्कम मार्शलच्या गोलंदाजीचा सामना करून आलं होतं!
अंशुमन गायकवाड यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शोक व्यक्त केला आहे. “क्रिकेटसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी अंशुमन गायकवाड कायम स्मरणात राहतील. त्यांना क्रिकेटची दैवी देणगी होती. ते एक अतुलनीय प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनामुळे मना मनस्वी दु:ख झालं आहे. त्यांचे कुटुंबीय व आप्तस्वकीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ओम शांती”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही एक्सवर शोक व्यक्त केला आहे. “अंशुमन गायकवाड यांचे कुटुंबीय व मित्र परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वालाच हे प्रचंड वेदनादायी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, अशी पोस्ट जय शाह यांनी केली आहे.