भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो आयपीएल २०२१मध्ये समालोचकाच्या भूमिकेत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व सांभाळलेल्या गंभीरने सध्याच्या संघाच्या अवस्थेबाबत मोठे विधान केले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यांना ४ पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गंभीरने कोलकाता संघाची मागील १२ वर्षातील सर्वात मोठी चूक सांगितली आहे.

गौतम गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असताना सूर्यकुमार यादव उपकर्णधार होता. २०१८मध्ये सूर्यकुमारला कोलकाताने रिलिज केले. आता तो मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. कोलकाताच्या या निर्णयाला गंभीरने सर्वात मोठी चूक म्हटले आहे.

गंभीर म्हणाला, “सूर्यकुमार यादवला टीममधून काढून टाकणे ही कोलकाता संघाची गेल्या १२ वर्षातील सर्वात मोठी चूक आहे.” सूर्यकुमार यादवने २०१२मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या मोसमात त्याला एकच सामना खेळण्याची संधी होती. त्यानंतर २०१४मध्ये त्याला कोलकाता नाइट रायडर्स संघात स्थान मिळाले. चार वर्ष कोलकाताकडून खेळल्यानंतर त्याला सोडण्यात आले. २०१८च्या हंगामात मुंबई इंडियन्सने ३.२ कोटी रुपयांच्या बोलीसह त्याला संघात समाविष्ट केले. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मुंबईच्या विजयात त्याने बर्‍याचदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गंभीरचे मॉर्गनविषयी विधान

ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वात कोलकाताने या मोसमात एक सामना जिंकला आहे. गंभीर म्हणाला, “जर भारतीय कर्णधार असता, तर लोकांनी त्याच्यावर टीका केली असती.” गंभीरचे हे विधान दिनेश कार्तिकशी संबधित होते. कार्तिकने २०२०मध्ये कोलकाताच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. कार्तिकने दबावामुळे कर्णधारपद सोडले होते, अशी चर्चा होती.