Monty Panesar has advised England players to sledging Virat Kohli : भारतीय संघाला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी व्हायचे आहे. इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघांत पाच कसोटी सामने खेळवली जाणार आहेत. संपूर्ण मालिकेत सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा विराट कोहलीवर असणार आहे. पहिल्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूने आपल्या गोलंदाजांना एक गुरुमंत्र दिला आहे, माजी क्रिकेटपटू माँटी पानेसर म्हणाला की, जर तुम्हाला विराट कोहलीला बाद करायचे असेल तर त्याचा अहंकार दुखावा.
इंडिया डॉट कॉमशी संवाद साधताना माँटी पानेसर म्हणाला, “विराट कोहलीच्या अहंकाराशी खेळा आणि त्याला गुंतवून ठेवा. तुम्ही त्याला म्हणू शकता की जेव्हा फायनलचा सामना असतो, तेव्हा तुम्ही नेहमी चोकर होतात. तुम्ही त्याला अशा प्रकारे स्लेज करू शकता. कारण बेन स्टोक्सने एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक जिंकला आहे, पण कोहलीने नाही. त्यामुळे तुम्ही त्याला अशा प्रकारे डिवचू शकता.”
विराट कोहलीसाठी कोणता गोलंदाज धोकादायक ठरू शकतो, असे विचारले असता? यावर माँटी म्हणाला, “मला वाटते जेम्स अँडरसनचा रिव्हर्स स्विंग कोहलीची विकेट घेऊ शकतो.” अँडरसनने विराट कोहलीला मागील १० कसोटी सामन्यांमध्ये फक्त एकदाच बाद केले आहे. कोहलीने अँडरसनविरुद्ध ३०५ धावा केल्या आहेत.
पानेसरने इंग्लंडच्या विजयात बजावली होती महत्त्वाची भूमिका –
२०१३ साली इंग्लंडने भारतीय मैदानावर कसोटी मालिका जिंकली होती. या विजयात माँटी पानेसरने महत्त्वाची भूमिका बजावली होता. त्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा इंग्लिश गोलंदाज होता. या मालिकेपासून भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.