न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. १६ सदस्यीय संघात अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने या बदलांचे स्वागत केले आहे. तो म्हणाला, ”आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षीस मिळताना पाहून आनंद होतो.” या मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह काही मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियात हर्षल पटेल, व्यंकटेश अय्यर आणि आवेश खान यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

आयपीएल २०२१ मध्ये हर्षल पटेलने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी ३२ विकेट घेतल्या. तर आवेश खानने २४ विकेट घेतल्या. या दोघांचा संघात समावेश केल्याचे लक्ष्मणने स्वागत केले. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे, तेथील खेळपट्ट्यांचा विचार करता ही एक उत्तम चाल आहे, असे तो म्हणाला. व्यंकटेश अय्यरबद्दल त्याने सांगितले, की तो टीम इंडियाला अष्टपैलू खेळाडूचा पर्याय देऊ शकतो. आयपीएल २०२१च्या यूएई टप्प्यात केकेआरसाठी सलामी देताना अय्यरने १० सामन्यात ३७० धावा केल्या.

हेही वाचा – T20 WC : पाकिस्तान की ऑस्ट्रेलिया?, ब्रायन लाराचं ‘या’ संघाला मत; आधीची भविष्यवाणी ठरलीय खरी!

लक्ष्मण म्हणाला, ”मला वाटते की अय्यरसारख्या फलंदाजाने त्याच्या स्थानाबाहेर फलंदाजी करावी. भारताला या संघात पाच सलामीवीर मिळाले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की इशान किशन, केएल राहुल आणि रोहित शर्मा या स्थानासाठी आघाडीवर आहेत. त्यामुळे व्यंकटेश अय्यरला संघात तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. त्याने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे आणि काही किंवा अधिक षटके टाकली पाहिजेत. तो हार्दिक पांड्याचा बॅकअप असू शकतो. तुम्ही व्यंकटेश अय्यरला एक उपयुक्त अष्टपैलू म्हणून विकसित करू शकता.”