दुबई: डावखुरा फलंदाज साई सुदर्शनमध्ये क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत यशस्वी ठरण्याची क्षमता असून आगामी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या पर्वाला (२०२५-२७) इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेने सुरुवात करणार आहे. ‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात साई सुदर्शनने गुजरात टायटन्सकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे सध्याची लय, कौंटी क्रिकेटचा अनुभव आणि आपल्या फलंदाजी तंत्रामुळे साई इंग्लंडच्या परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतो, असे शास्त्री यांना वाटते. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्याला २० जूनपासून हेडिंग्ली कसोटीने सुरुवात करेल.

‘साई सुदर्शन सर्व प्रारूपांत चांगल्या पद्धतीने खेळू शकतो.तो गुणवान क्रिकेटपटू आहे. इंग्लंडमधील परिस्थितीत तुम्हाला साईसारखे तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेले फलंदाज हवे असतात.तसेच संयम राखून खेळण्याचीही त्याच्यात क्षमता आहे. त्यामुळे त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळायला हवे,’असे शास्त्री ‘आयसीसी’च्या स्तंभात म्हणाले.

या दौऱ्यासाठी ‘आयपीएल’मध्ये लयीत असलेल्या श्रेयस अय्यरलाही संधी मिळण्याची शक्यता आहे, असे शास्त्री यांना वाटते.‘श्रेयसचे कसोटी संघात पुनरागमन होऊ शकते. मात्र, त्याला इतर खेळाडूंशी स्पर्धा करावी लागेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचे भारतीय संघातील स्थान निश्चित आहे.मात्र,कसोटी क्रिकेटमध्ये उर्वरित खेळाडू कोण आहेत हे पाहावे लागेल,असे शास्त्री यांनी सांगितले.भारताच्या गोलंदाजांच्या फळीत एक डावखुरा गोलंदाज असल्यास ते फायदेशीर ठरेल,असेही शास्त्री यांनी नमूद केले.