Dilip Vengsarkar On Team India Selection For Australia Tour: येत्या काही दिवसात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माला वनडे संघात स्थान दिलं आहे, पण त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. रोहित आणि विराट दोघेही ८ महिन्यांनंतर वनडे संघात पुनरागमन करणार आहेत, दरम्यान या दोघांनाही संघात स्थान देण्यावरून माजी निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मिड-डे ला दिलेल्या मुलाखतीत दिलीप वेंगसरकर यांनी विराट- रोहितला वनडे संघात स्थान देण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हे दोन्ही फलंदाज क्रिकेटपासून दूर आहेत. दोघेही केवळ वनडे क्रिकेट खेळणार आहे. मग एक फॉरमॅट खेळत असलेल्या खेळाडूंना संघात स्थान का दिलं, असा सवाल दिलीप वेंगसरकरांनी निवडकर्त्यांना विचारला आहे.
दिलीप वेंगसरकर म्हणाले, “रोहित आणि विराट दिग्गज खेळाडू आहेत, पण जर दोघेही एकच फॉरमॅट खेळत असतील तर निवडकर्त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. या दोघांनी शेवटचा सामना खेळून झाल्यानंतर बराच वेळ विश्रांती केली आहे. त्यामुळे मला वाटतं की, अशा खेळाडूंच्या फॉर्मचा आणि फिटनेसचा अंदाज घेता येत नाही.”
मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी फिटनेस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली म्हणजे दोघेही वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग असतीलच असं नाही. ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी या दोघांना संधी मिळणार की नाही, हे या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कामगिरीच्या आधारे ठरवलं जाणार आहे. दोघे वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही, हे दोघांच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचं आगरकरांनी सांगितलं.