नवी दिल्ली : लैंगिक शोषणाविरोधात भारतीय कुस्तीगिरांच्या न्याय लढय़ाला राजकीय पािठबा वाढत असून जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांची बुधवारी भेट घेतली. देशासाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना यावेळी मलिक यांनी व्यक्त केली.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करणे आणि त्यांच्या अटकेची मागणी करत रविवारपासून आघाडीचे कुस्तीगीर पुन्हा आंदोलनास बसले आहेत.‘‘आपल्या देशातील मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून देशवासीयांची मान अभिमानाने उंचावतात. पदक जिंकल्यानंतर या खेळाडू मायदेशी परतल्यावर त्यांना भेटीचे आमंत्रण देऊन त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढली जातात. मात्र, आज याच मुली न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. म्हणूनच या कुस्तीगिरांच्या लढय़ात अखेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे,’’ असे मलिक म्हणाले.

‘‘कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यावर मुलींकडून पुरावे मागितले जाणे हे दुर्दैवी आहे. हा प्रश्न केवळ महिला खेळाडूंचा नाही, तर देशातील मुलींच्या प्रतिष्ठेचा आहे,’’ असेही मलिक यांनी नमूद केले.

आमचीही ‘मन की बात’ ऐका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही ‘बेटी बचाओ.. बेटी पढाओ’ योजना राबवता. प्रत्येकाची बाजू ऐकता. मग गेले चार दिवस लैंगिक शोषणाच्या त्रासातून जाणाऱ्या आमच्याही मनाची गोष्ट (‘मन की बात’) तुम्ही ऐकून घ्या, असे साकडे कुस्तीगिरांनी थेट पंतप्रधान मोदी यांना घातले आहे. पदक जिंकले की आम्हाला बोलावता, मग आता न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागल्यावर आमच्याकडे दुर्लक्ष का? असा सवालही साक्षी मलिकने उपस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जंतरमंतरवरच सराव

न्यायासाठी लढतानाच सरावाकडे दुर्लक्ष होऊ नये याकरिता कुस्तीगिरांनी बुधवारी रस्त्यावरच सरावाला सुरुवात केली आहे.