पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया चषकात अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही मात्र हळूहळू त्यांनी कामगिरीत सुधारणा करत शेवटचा टप्पा गाठला आहे. या वाटचालीत मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांचा सिंहाचा वाटा आहे. माईक हेसन हे नाव भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अजिबातच नवीन नाही. प्रशिक्षक, समालोचक, पॅनेलिस्ट अशा विविध भूमिकांमध्ये हेसन कार्यरत असतात. मॅन मॅनेजमेंटमध्ये वाकबगार आणि तांत्रिक खाचाखोचा पक्क्या करण्यात माहीर अशी त्यांची ओळख आहे.
अगदी आतापर्यंत आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात विराट कोहलीच्या संघाची धुरा हेसन यांच्याकडे होती. टीम डिरेक्टर आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिका त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. आरसीबी संघाने २०२५ मध्ये पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं.मात्र सातत्याने अनेक वर्ष संघाला विजयपथावर ठेवण्यात हेसन यांची भूमिका मोलाची होती. लिलावात चांगले खेळाडू पारखून घेण्यातही त्यांचा वाटा महत्त्वाचा होता. कर्णधार आणि संघाचा आधारवड असलेल्या विराट कोहलीशी हेसन यांचे जिव्हाळ्याशी संबंध आहेत.
आयपीएल तसंच अन्य सामन्यांवेळी हेसन समालोचक तसंच एक्सपर्ट म्हणून उपस्थित असतात. खेळाडूंबाबत, खेळातल्या बारकाव्यांबाबत त्यांचं म्हणणं ऐकणं उपयुक्त असतं. शांतपणे आपलं म्हणणं मांडण्यात त्यांची हातोटी आहे. क्रिकेटविश्वात खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफला त्यांच्याप्रति आदर वाटतो. अनेक युवा खेळाडू घडवण्यात तसंच युवा खेळाडूंना खेळातल्या त्रुटी दूर करून देण्यात ते निष्णात मानले जातात. पाकिस्तान क्रिकेट संघालाही त्यांच्या ज्ञानाचा फायदाच होताना दिसतो आहे.
आरसीबी संघाबरोबरीने हेसन यांनी पंजाब किंग्ज संघाचं मुख्य प्रशिक्षकपदही भूषवलं आहे. आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानात आयोजित होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनात इस्लामाबाद संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं.
पाकिस्तान क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपद हा काटेरी मुकूट मानला जातो. हेसन यांच्याआधी जेसन गिलेस्पी आणि गॅरी कर्स्टन यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि या दोघांमध्ये मतभेद झाल्याने दोघांनीही पदभार सोडण्याचा निर्णय घेतला. मानधनाचा मुद्दा, अंतर्गत राजकारण, बेबनाव यामुळे या संघाचं प्रशिक्षकपद सांभाळणं अत्यंत अवघड समजलं जातं. भाषेचाही मुद्दा असतो. पाकिस्तान संघाचे खेळाडू ऊर्दू, हिंदीमध्ये बोलतात. हेसन इंग्रजीत बोलतात. पण तूर्तास हेसन यांनी हा अडथळा पार केल्याचं दिसतं.
आयपीएल संघांबरोबर प्रशिक्षक म्हणून काम केल्याने तसंच समालोचक-तज्ज्ञ म्हणून वार्तांकन केल्याने भारतीय खेळाडूंबाबत हेसन यांना सखोल माहिती आहे. भारतीय खेळाडूंचे कच्चे दुवेही त्यांना ठाऊक आहेत. त्यामुळेच भारताविरुद्ध खेळताना हेसन यांचा अनुभव पाकिस्तान संघासाठी अतिशय मोलाचा ठरू शकतो.
हेसन हे २०१२ ते २०१८ या कालावधीत न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक होते. न्यूझीलंडच्या संघाच्या दमदार कामगिरीत त्यांचं योगदान अमूल्य असं आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक म्हणून सर्वाधिक वर्ष कार्यभार सांभाळणारे प्रशिक्षक आहेत. संघाची घडी बसवण्यात तसंच उत्तम मॅन मॅनेजर अशी त्यांची ख्याती आहे. त्याआधी केनिया संघाचं प्रशिक्षकपदही त्यांनी भूषवलं आहे.