वृत्तसंस्था, दोहा : आघाडीपटू ऑलिव्हिएर जिरुडने नोंदविलेल्या विक्रमी दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने विश्वचषक विजेतेपद टिकविण्याच्या मोहिमेस विजयी सुरुवात केली. फ्रान्सने ऑस्ट्रेलियावर ४-१ असा विजय मिळविला. अल जनाब स्टेडियमवर बुधवारी झालेला सामना जिरुडच्या विक्रमी कामगिरीबरोबरच फ्रान्सच्या अचूक नियोजनबद्ध खेळासाठी लक्षात राहिली. वयाच्या ३६ व्या वर्षी फ्रान्सचे प्रतिनिधित्व करताना जिरुडने दोन गोल करत फ्रान्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. जिरुड फ्रान्स संघातील सर्वात वयस्क खेळाडू आहे. गिरु ३६ वर्षे ५३ दिवसांचा असून, त्याने दोन गोल करत थिएरी हेन्रीच्या ५१ आंतरराष्ट्रीय गोलची बरोबरी केली.

ऑस्ट्रेलियाच्या गुडविनने सामन्याच्या नवव्या मिनिटाला गोल करून धडाकेबाज सुरुवात केली. यंदाच्या स्पर्धेतील हा सर्वात वेगवान गोल ठरला. या गोलनंतर ऑस्ट्रेलिया खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला.  फ्रान्सच्या किलियम एम्बाप्पेची पुरती कोंडी झाली होती. अशाही परिस्थितीत फ्रान्सच्या खेळाडूंनी आव्हानावर मात करण्यासाठी शोधलेला मार्ग आणि नंतर ऑस्ट्रेलियावर राखलेले वर्चस्व बघण्यासारखे होते. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिछाडीवर पडल्यानंतर रोखली जाणारी आक्रमणं आणि प्रतिस्पर्ध्यानी केलेला आपल्या खेळाचा अभ्यास लक्षात घेत फ्रान्सच्या खेळाडूंनी मैदानातच नियोजन बदलले. प्रमुख मध्यरक्षकांशिवाय खेळण्याची उणीव फ्रान्सला सुरुवातीच्या दहा मिनिटांत जाणवली. पण, त्यानंतर आघाडीच्या फळीने मध्यरक्षकांना हाताशी धरून रचलेल्या चालींनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी धसकाच घेतला. झपाटय़ाने अव्वल मध्यरक्षक म्हणून नावारूपाला येत असलेल्या रायबोने फ्रान्सला आघाडीवर नेले. त्यानंतर रॅबियोच्याच क्रॉस पासवर जिरुडने फ्रान्सला आघाडीवर नेले. नवव्या मिनिटाला झालेला गोल आणि त्यापूर्वी बचावपटू लुकास हर्नाडेझला दुखापतीमुळे गमवावे लागल्याने फ्रान्सची चिंता वाढली होती. मात्र, अनुभव आणि कौशल्याचा प्रभावी समतोल राखत फ्रान्सने या परिस्थितीवर मात करत एका जबरदस्त विजयाची नोंद केली. उत्तरार्धात एम्बाप्पेने ६८व्या मिनिटाला गोल करण्याची संधी साधली. तीनच मिनिटांनी जिरुडने वैयक्तिक दुसरा गोल करून फ्रान्सची आघाडी भक्कम केली. डेम्बेलेच्या वेगालाही ऑस्ट्रेलियन रोखू शकले नाहीत.