Team India answer to Tollers after Women’s World Cup 2025: नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर इतिहास घडला. जे आजवर कधीच घडलं नव्हतं ते पहिल्यांदाच घडलं. भारताने महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी नमवलं आणि पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. भारतात महिलांचे अधिकृत क्रिकेट सामने १९७३ मध्ये खेळवले गेले होते. तेव्हा फक्त महिलांचं क्रिकेट सुरू झालं, पण खरी ओळख २ नोव्हेंबर २०२५ ला मिळाली. भारताला महिला वर्ल्डकपची पहिली ट्रॉफी उंचावण्यासाठी ५२ वर्षे लागली. या काळात बऱ्याच गोष्टी घडल्या. चढउतार, विजय आणि पराभव हा खेळाचा एक भाग आहे. पण आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे टीका. वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंचं जितकं कौतुक होत आहे, त्याहून दुप्पट टीका केली गेली होती.

वर्ल्डकप जिंकल्यानंतर जेव्हा हरमनप्रीत कौर पत्रकार परिषदेत आली, त्यावेळी तिला सतत होणारी टीका याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “मला वाटतं टीका होणं हा देखील जीवनाचा एक भाग आहे. प्रत्येक गोष्ट चांगलीच असावं असं नाही. टीका गोष्टी संतुलित राहतात.” खेळाडू या गोष्टींकडे नेहमीच सकारात्मक नजरेने पाहतात. कारण एक चांगली खेळी करून पुन्हा एकदा चाहत्यांचा विश्वास जिंकता येतो.

पण काही ट्रोलर्स चांगल्या खेळीचं कौतुक करायचं सोडून, वाईट कामगिरी कधी करणार? याची वाट पाहतात. कारण ते जास्त खपनीय आहे. आधी पराभव झाला, अंतिम सामना गमावला की निषेध व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. मोर्चे काढले जायचे, पुतळे जाळले जायचे, चपलांचा हार घातला जायचा आणि घरावर दगडफेक केली जायची. आता काळानुसार ट्रेंड बदलला आहे. ट्रोलिंग सुरूच आहे, पण पद्धत बदलली आहे. मोर्चे काढण्याऐवजी हॅशटॅग ट्रेंड केले जातात. दगडफेक करण्याऐवजी सोशल मीडियावर मीम्स व्हायरल केले जातात. हे वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघासोबत देखील झालं.

फार मागे जाण्याची गरज नाही. भारताला साखळी फेरीत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही बलाढ्य संघांकडून पराभवाचा सामना करावा लागला. सामने अटीतटीचे रंगले, पण भारतीय खेळाडू थोडक्यात मागे राहिले. त्यामुळे हातचे सामने निसटले. वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग बंद होत चालला होता. त्यावेळी ट्रोलर्स सक्रीय झाले.

यांनी फक्त सोशल मीडियावर रिल्स बनवावं, क्रिकेट खेळणं यांचं काम नाही. काहींनी तर घरी जा आणि जेवण बनवा ते तुमचं काम आहे असं म्हटलं. बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वीच समान मानधन द्यायला सुरुवात केली आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना मिळणारं मानधन सारखंच आहे. पण कामगिरी अशी का? सोशल मीडिया, डान्स, रिल्स हे खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यातील एक भाग आहे. पण सोशल मीडियाच्या या जगात कुठलाही विचार न करता खेळाडूंना ट्रोल केलं जातं. पण महिला वर्ल्डकपमधील हा विजय, सर्व ट्रोल करणाऱ्यांना एक सणसणीत चपराक आहे.

तिकिटांसाठी झालेली कसरत

भारतीय महिला संघाचे सामने आधी स्टेडियममध्ये जाऊन फुकटात पाहायला मिळायचे. पण तरीदेखील मैदान रिकामी असायची. यंदाच्या वर्ल्डकपसाठी तिकिटांची रक्कम १०० ते २५० रुपये इतकी होती. वर्ल्डकपचा सामना पाहण्यासाठी २५० रुपये फार नाहीत. पण तरीदेखील प्रेक्षकांनी पाठ फिरवली. भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी मोजकेच प्रेक्षक मैदानात असायचे. भारतीय संघ सेमी फायनलमध्ये जाणार अशी आशाच क्रिकेट चाहत्यांनी सोडून दिली होती.

त्यामुळे बुक माय शो ॲपवर तिकिटे उपलब्ध असतानाही कोणी खरेदी करत नव्हतं. न्यूझीलंडला पराभूत करून भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमी फायनलचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार होता. ९० टक्के लोकांना वाटलं असावं की, भारतीय संघ हा सामना गमावणार. हा सामना सुरू असताना सुद्धा अंतिम सामन्याची तिकिटे उपलब्ध होती. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघासमोर भारताचा निभाव लागणार नाही. म्हणून कोणीच तिकीट खरेदी केलं नव्हतं. जे खरे क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांना वर्ल्डकप फायनल पाहायला मिळणं हीच मोठी गोष्ट वाटली. कोणताही संघ अंतिम फेरीत प्रवेश करू दे, पण विजय क्रिकेटचाच होता. अशी धारणा असलेल्या चाहत्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत मिळाली.

पण ज्यांना अपेक्षाच नव्हती की, टीम इंडिया असं काही करू शकते. अशांना बुक माय शो ॲपवर ‘कमिंग सून’चा मेसेज पाहायला मिळाला. वाट पाहूनही तिकिटं काही मिळाली नाहीत. शेवटी मैदानाबाहेर जाऊन १०००,२००० काहींनी तर ५००० रुपयांना तिकीट खरेदी केलं. एकेकाळी फुकटात असूनही ओसाड पडलेलं मैदान आणि वाटेल ती किंमत घेऊन खरेदी केलेलं तिकीट, हा सुद्धा महिला क्रिकेट संघाचा विजयच आहे.