पीटीआय, नवी दिल्ली
प्रत्येकच खेळाडूला कारकीर्दीत आव्हानात्मक काळातून जावे लागते. धावांसाठी झगडावे लागते. त्यामुळे केवळ केएल राहुलला लक्ष्य करणे योग्य नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने राहुलसारख्या प्रतिभावान खेळाडूला पाठिंबा देत राहणे गरजेचे आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले.
भारताचा सलामीवीर राहुलवर गेल्या काही काळापासून बरीच टीका होत आहे. गेल्या १० कसोटी डावांमध्ये राहुलला एकदाही २५ धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत मिळून त्याने केवळ ३८ धावा केल्या आहेत. त्यातच त्याला संधी मिळावी यासाठी लयीत असलेल्या शुभमन गिलला संघाबाहेर बसावे लागत आहे. त्यामुळे काही क्रिकेट समीक्षक आणि चाहत्यांकडून राहुलला कसोटी संघातून वगळण्याची मागणी केली जाते आहे. त्याच्याकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले आहे.
‘‘राहुलला भारतीय संघातून वगळण्यात येऊ नये असे माझे मत आहे. केवळ एका खेळाडूवर टीका करणे, त्याला लक्ष्य करणे योग्य नाही. प्रत्येक खेळाडूला कारकीर्दीत आव्हानात्मक काळातून जावे लागते. त्यामुळे कोणत्याही क्रिकेटतज्ज्ञाने किंवा चाहत्याने राहुलवर आणि त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित करू नयेत,’’ असे गंभीर म्हणाला.
इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) लखनऊ सुपर जायंट्स संघाचे सराव शिबीर सुरू झाले असून तेथेच गंभीरने माध्यमांशी संवाद साधला. राहुल लखनऊ संघाचा कर्णधार असून गंभीर प्रेरकाची भूमिका बजावत आहे. गंभीरने राहुलची पाठराखण करताना रोहित शर्माचे उदाहरण दिले.
‘‘प्रतिभावान खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने पाठिंबा देणे गरजेचे आहे. आपल्यासमोर रोहित शर्माचे उत्तम उदाहरण आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीला रोहितला धावांसाठी झगडावे लागत होते. मात्र, त्याच्यातील प्रतिभा आणि गुणवत्ता सर्वाना ठाऊक होती. संघ व्यवस्थापनाने त्याला पाठिंबा दिला आणि त्याची कारकीर्द बहरली. आता तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. राहुलमध्येही अशी क्षमता आहे,’’ असे गंभीरने नमूद केले.
‘डब्लूपीएल’ महत्त्वाचे पाऊल!
महिला प्रीमियर लीग (डब्लूपीएल) हे क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत गंभीरने व्यक्त केले. ‘‘या स्पर्धेमुळे अनेक लहान मुलींना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळेल. तसेच महिला क्रिकेटचा अधिक प्रसार होईल. ‘डब्लूपीएल’ स्पर्धा ऐतिहासिक ठरेल,’’ असे गंभीरने सांगितले.