Micheal Clarke On Gautam Gambhir: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील २ सामने इंग्लंडने जिंकले. तर २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली. १ सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ही मालिका २-२ ने बरोबरीत समाप्त झाली. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या मते गौतम गंभीरने एक चूक केली नसती तर भारतीय संघाने ही मालिका जिंकली असती. काय म्हणाला मायकल क्लार्क? जाणून घ्या.
मायकल क्लार्कच्या मते भारतीय संघाने जर कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं असतं तर त्याने संपूर्ण मालिकेत २० गडी बाद करून दिले असते. यासह मालिका देखील जिंकली असते. कुलदीप यादवचा या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण त्याला मालिकेतील एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्याची मागणी जोर धरत होती, पण शेवटपर्यंत गंभीरने त्याला संधी दिली नाही.
बियाॅंड २३ क्रिकेट पॉडकास्टमध्ये बोलताना मायकल क्लार्क म्हणाला, “ कुलदीप यादवचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करणं हे भारतीय संघासाठी निर्णायक ठरू शकलं असतं. कुलदीप यादव हा भारतीय संघाला २० गडी बाद करून देणारा गोलंदाज आहे.”
रवींद्र जडेजा – वॉशिंग्टन सुंदरचं केलं कौतुक
या मालिकेत फिरकी गोलंदाज म्हणून संधी मिळालेल्या रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील दमदार कामगिरी केली. दोघांनी भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करताना तो म्हणाला, “ तुम्ही वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दोघांनी गोलंदाजीत आणि फलंदाजीत दमदार कामगिरी केली. दोघांनी कौतुकास्पद कामगिरी केली.”
तसेच तो पुढे म्हणाला, “ कुलदीप यादव हा भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर आहे. त्याने भारतीय संघाला २० गडी बाद करून देण्यात मोलाची भूमिका बजावली असती. ” कुलदीप यादवला या मालिकेतील पाचही सामन्यात बाकावर बसून राहावं लागलं.