वृत्तसंस्था, बेकनहॅम
इंग्लंड दौरा आव्हानात्मक असला, तरी सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास काहीही शक्य आहे. तुम्ही ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर येणे सर्वांत महत्त्वाचे असल्याचा संदेश भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने युवा खेळाडूंना दिला. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी त्रिकुटाच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला आगामी इंग्लंड दौऱ्यात युवा खेळाडूंवर अवलंबून राहावे लागणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होईल. भारतीय संघ २००७ नंतर इंग्लंडमध्ये पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. या मालिकेकडे आपण काहीतरी खास करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे असा सल्ला गंभीरने खेळाडूंना दिला.
‘‘या दौऱ्याकडे दोन दृष्टिकोनांतून पाहता येऊ शकते. एक म्हणजे आपल्याला तीन सर्वांत अनुभवी खेळाडूंविना खेळावे लागणार आहे. दुसरे म्हणजे आपल्याला देशासाठी काहीतरी खास करण्याची उत्तम संधी आहे. आपले यश तुमच्या दृष्टिकोनावरच अवलंबून असेल,’’ असे गंभीर खेळाडूंना उद्देशून म्हणाला. याची चित्रफीत ‘बीसीसीआय’ने समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली.
‘‘मी जेव्हा तुमच्याकडे पाहतो, तेव्हा मला यशासाठीची भूक, जिद्द आणि वचनबद्धता दिसते. आपण त्याग केले, ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडलो, दररोज नाही तर प्रत्येक सत्रात, प्रत्येक तासाला आणि प्रत्येक चेंडूवर लढायला सुरुवात केली, तर हा संस्मरणीय दौरा ठरू शकेल,’’ असे सांगत गंभीरने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला.
खेळाडूंचे स्वागत
गंभीरने नव्या खेळाडूंचे स्वागत केले. ‘‘कसोटी संघात पहिल्यांदा आपले नाव दिसते, तो क्षण खूप खास असतो. मला साई सुदर्शनचे संघात स्वागत करायचे आहे. गेल्या तीन महिन्यांत तुझ्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघाल्या आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्ये हीच लय कायम राखताना यशस्वी कारकीर्द घडविण्याचा प्रयत्न कर. तसेच अर्शदीप सिंगचेही स्वागत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तू उत्कृष्ट कामगिरी केली आहेस. मात्र, कसोटीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. कसोटी संघाचा भाग झाल्याबद्दल तुझे अभिनंदन,’’ असे गंभीर म्हणाला.
तसेच त्याने पुनरागमनवीर करुण नायरचा विशेष उल्लेख केला. ‘‘पुनरागमन करणे कधीही सोपे नसते. त्यात सात वर्षांनी संघात परतण्यासाठी किती संघर्ष करावा लागला असेल हे मी समजू शकतो. गेले वर्ष तुझ्यासाठी अविस्मरणीय ठरले. तू जितक्या धावा केल्यास आणि तुझी कधीही हार न मानण्याची जिद्द या संघाला हवी आहे. तुझ्याकडून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. करुण नायर, कसोटी संघात तुझे स्वागत आहे,’’ असेही गंभीर म्हणाला.
प्रत्येक सराव सत्र महत्त्वाचे गिल
कसोटी मालिकेपूर्वी आपल्यासाठी प्रत्येक सत्र खूप महत्त्वाचे असल्याचे कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाला. ‘‘सराव सत्रातही स्वत:वर दडपण आणा, जेणेकरून आपण कसोटी सामन्यासाठी उतरू, तेव्हा आपल्याला वेगळे दडपण जाणवणार नाही. केवळ खेळपट्टीवर टिकून राहणे महत्त्वाचे नाही. आपण वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दडपणाखाली असल्यास आपण कसे प्रत्युत्तर देतो, हे नेट्समध्येही फलंदाजी आणि गोलंदाजी करताना कळू शकते. त्यामुळे सरावातही लक्ष केंद्रित करून खेळा,’’ असे गिल म्हणाला.
भारताच्या आव्हानासाठी सज्ज मॅककलम
भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी चांगल्या तयारीनिशी येईल. मात्र, त्यांच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅककलमने सांगितले. ‘‘भारतीय संघ कायमच चांगले क्रिकेट खेळतो. आता दमदार कामगिरी करण्याच्या अपेक्षा बाळगूनच ते इंग्लंडमध्ये दाखल झाले असतील. मात्र, या आव्हानासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ असे मॅककलम म्हणाला. ‘‘ आमच्याकडे ख्रिास वोक्स, सॅम कूक, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हर्टन, जोश टंगच्या रूपात चांगले गोलंदाज आहेत. फिरकीची धुरा यशस्वीपणे सांभाळण्यात शोएब बशीर सक्षम आहे. आमची कसोटी लागेल यात शंका नाही, पण आम्ही पूर्ण तयारीनिशीच मैदानात उतरू,’’ असा विश्वास मॅककलमने व्यक्त केला.