Gautam Gambhir On Rahul Gandhi Video: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर मागील काही महिन्यांपासून या ना त्या वादामुळे चर्चेत आहे. आयपीएलच्या वेळी नवीन उल हक आणि विराट कोहलीच्या वादात गंभीरने घेतलेला पवित्रा पाहता भारतीय चाहत्यांनी सुद्धा त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता भारताचा माजी खेळाडू श्रीसंतला मैदानात ‘फिक्सर’ म्हणून संबोधल्याने गौतम गंभीर विरुद्ध श्रीसंत असा वाद सोशल मीडियावर चर्चेत आहे. केवळ क्रिकेटच्या मैदानातच नव्हे तर आता राजकीय वादात सुद्धा गौतम गंभीरचं नाव पुढे येत आहे. भाजपचे विद्यमान खासदार पद भूषवणाऱ्या गंभीरने थेट राहुल गांधी यांना सुनावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या ‘पनौती’ उल्लेखाबद्दल काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर गंभीरने टीका केली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2023 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला तेव्हा त्यांच्या उपस्थितीबद्दल पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवण्यासाठी राहुल गांधींनी ‘पनौती’ हा शब्द वापरला. राजस्थानच्या बालोत्रा येथे एका जाहीर सभेत काँग्रेस खासदार म्हणाले, “आमची मुले विश्वचषक जिंकणार होती, पण पनौतीमुळे त्यांचा पराभव झाला. हे टीव्ही चॅनेल सांगणार नाहीत पण जनतेला माहीत आहे.
स्मिता प्रकाश यांच्यासह एएनआय पॉडकास्टवर बोलताना गौतम गंभीरने पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल गांधींवर टीका केली. गंभीर म्हणाला की, “कदाचित हा सर्वात वाईट शब्द आहे जो कोणीही कोणाच्या विरोधात विशेषत: या देशाच्या पंतप्रधानाच्या बाबत वापरला असेल, २०११ च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग उपस्थित होते. जर आम्ही सामना हरलो असतो आणि ते आम्हाला भेटायला आले असते तर त्यात गैर काय होतं?
गौतम गंभीर आणि श्रीसंतचा वाद काय?
सुरत येथे बुधवारी इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातील लिजेंड्स लीग क्रिकेट २०२३ एलिमिनेटर दरम्यान गौतम गंभीर व त्याचा माजी सहकारी एस श्रीसंत यांच्यात जोरदार वाद झाला. दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये मैदानावर शाब्दिक भांडण झाले ज्यामुळे गुजरात जायंट्सचा कर्णधार पार्थिव पटेल आणि मैदानावरील पंचांना ताबडतोब हस्तक्षेप करावा लागला.
हे ही वाचा<< “मुलाने डोळ्यावर लाथ मारली, दोन वर्ष मी..”, एबी डिव्हिलियर्सचा किस्सा ऐकून डॉक्टरही विचारू लागले, कसं शक्य आहे?
एलएलसी एथिक्स आणि कोड ऑफ कोड कमिटीचे प्रमुख सय्यद किरमानी यांनी श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, एलएलसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणार्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील गैरवर्तणुकीवर आवश्यक कारवाई केली जाईल याचे आश्वासन दिले. दरम्यान, एलएलसी कमिशनने गौतम गंभीरने श्रीसंतला ‘फिक्सर’ म्हटल्याबद्दल त्याला कायदेशीर नोटीस पाठवली असून भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाला व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे.