बुधवारी आशिया चषकामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा आठ गड्यांनी पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफ्रीतील पराभवाचा वाचपा काढला. या सामन्यापूर्वी एका वृत्तवाहिनीवर भारत-पाक या सामन्यावर झालेल्या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत आणि पाकिस्तानेचे दिग्गज खेळाडू या वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी झाले होते. यामध्ये पाकिस्तानच्या एक माजी खेळाडूला गौतम गंभीरने चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडियावर गौतम गंभीरचे कौतुक केले जात आहे. तर पाकिस्तानच्या तनवीर अहमदला चांगलेच झापत आहेत.

सामन्यापूर्वी भारताच्या एबीपी आणि पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तवाहिनीमध्ये ट्रांसमिशन सुरू होते. दोन्ही देशातील खेळाडू चर्चेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये पाकिस्तानच्या तनवीर अहमद विराट कोहलीने आशिया चषकातून पळ काढला असे वक्तव्य करत गौतमला गंभीर केले. चर्चेदरम्यान तनवीर म्हणाला, ‘ विराट कोहली पाकिस्तानला घाबरतो म्हणून आशिया चषकातून माघर घेतली. इंग्लंडमध्ये विराट कोहलीला दुखापत झाली होती तरीही मैदानावर उतरला होता. मग पाकिस्तानबरोबर का नाही खेळत? विराट पाकिस्तानला घाबरला आहे. त्यामुळेच आशिया चषकातून माघार घेतली आहे. जर एखादा खेळाडू आपल्या देशासाठी इंग्लंड विरोधात खेळू शकतो तर पाकिस्तान विरोधात का नाही? माझ्या मते विराट कोहली पाकिस्तानला घाबरला आहे.’ या वक्तव्यावर भारताच्या गौतमने तनवीरला चांगलेच सुनावले.

‘तनवीर आणि विराट कोहलीमध्ये खुप अंतर आहे. तनवीरपेक्षा विराट कोहलीचा क्रिकेटमधील अनुभव जास्त आहे. विराट कोहलीच्या नावावर ३५ आंतरराष्ट्रीय शतके आहेत आणि तनवीरने तेवढे सामनेही खेळले नाहीत. सध्या भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्तान पाचव्या. यावरून कोणता संघ बलाढ्य आहे हे समजून जातेय.’ तनवीरच्या प्रश्नावर गौतमने असे उत्तर दिले.

आशिया चषकात १९ तारखेला झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८ गड्याने पराभव केला. आता सुपर फोरमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.