नवी दिल्ली : विख्यात आणि खेळाडूप्रिय क्रिकेट पंच अशी ख्याती असलेल्या इंग्लंडच्या हेरॉल्ड ‘डिकी’ बर्ड यांचे मंगळवारी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. त्यांना क्रिकेटविश्वातून आदरांजली वाहण्यात आली असून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी खेळाडूंवरील ताण, दबाव समजून घेणारे पंच आणि एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व, अशा शब्दांत बर्ड यांचे वर्णन केले.

‘‘तब्बल दोन दशकांहून अधिक काळ पंच म्हणून भूमिका बजावणारे बर्ड स्वतः प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले होते. त्यामुळे त्यांना खेळाडूंवर असलेला ताण आणि दबाव याची चांगली जाण होती. आपले निर्णय कधी खेळाडूंना पटले नाहीत, तर त्यांच्या निराशेबद्दल बर्ड यांना सहानुभूती होती. क्रिकेटने एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व गमावले,’’ अशी भावना गावस्कर यांनी व्यक्त केली.

‘‘बर्ड नेहमी षटकादरम्यान किंवा कधी-कधी दोन चेंडूंच्या दरम्यानही खेळाडूंशी संवाद साधायचे. त्यामुळे ते खेळाडूंमध्ये लोकप्रिय होते. सर्वच खेळाडूंना त्यांनी खूप आदर दिला. ते एक परिपूर्ण पंच होते,’’ असेही गावस्कर म्हणाले. बर्ड यांनी ६६ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले.

‘‘बर्ड यांच्या निधनाने क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला आहे. एक अभिमानी आणि खेळाडूप्रिय पंच क्रिकेटने गमावला. त्यांची आठवण कायम येत राहील,’’ असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनेही बर्ड यांना आदरांजली वाहिली. ‘‘बर्ड नावाची एक आख्यायिका आज संपली. निःपक्षपाती, प्रामाणिक आणि अत्यंत विनोदी. डिकी बर्ड यांची कायम आठवण येत राहील,’’ असे कार्तिकने म्हटले आहे. ‘‘अद्वितीय माणूस आणि महान पंच. मी चांगला मित्र गमावला,’’ अशी भावना इंग्लंडचे माजी यष्टिरक्षक जॅक रसेल यांनी व्यक्त केली आहे.