Virat Kohli- Rohit Sharma: भारताचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दुर आहेत. दोघांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या काही महिन्यात वनडे मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे या जोडीला मैदानात उतरण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान ही जोडी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मैदानावर पुनरागमन करू शकते.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्याआधी दोघांनी कसोटी क्रिकेटलाही रामराम केलं. त्यामुळे आता ही जोडी थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका खेळताना दिसेल, असं म्हटलं जात होतं. दरम्यान ही जोडी ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध होणाऱ्या मालिकेत भारतीय अ संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसू शकते.

येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया अ चा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान ३ वनडे आणि २ मल्टी डे सामन्यांची मालिका रंगणार आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी भारतीय अ संघाकडून खेळताना दिसू शकते. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या मालिकेआधी दोघांनाही सराव करण्याची ही उत्तम संधी असणार आहे.

भारत अ विरूद्ध ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या मालिकेत ३ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३० सप्टेंबर, दुसरा सामना ३ ऑक्टोबर आणि तिसरा सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाईल. हे तिन्ही सामने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर, दुसरा सामना २३ ऑक्टोबर आणि तिसरा सामना २५ ऑक्टोबरला रंगणार आहे.

विराट आणि रोहित या दोघांनी फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यामुळे दोघांना संघात स्थान मिळवण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला आहे. दोघेही ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळणार, हे निश्चित आहे. पण ही जोडी २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.