पीटीआय, मेलबर्न

यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या जायबंदी असलेल्या प्रमुख खेळाडूंची उणीव भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत जाणवेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केले. तसेच पंत आणि बुमराच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ काहीसा कमकुवत दिसत असून ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, असेही चॅपल म्हणाले.

‘‘ऑस्ट्रेलियाचा संघ ही मालिका जिंकू शकतो. पंत, बुमरा आणि रवींद्र जडेजा यांसारख्या भारताच्या प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच काळानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर काहीसा कमकुवत दिसतो आहे. भारतीय संघ आता विराट कोहलीवर अधिकच अवलंबून असेल,’’ असे चॅपल यांनी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील आपल्या स्तंभलेखात लिहिले.

गेल्या वर्षी ३० डिसेंबरला कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मार लागला. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. पंतला आता जवळपास वर्षभर मैदानाबाहेर राहावे लागू शकेल. दुसरीकडे, बुमरा पाठीच्या दुखापतीतून आताच सावरल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, या दुखापतीतून सावरल्यानंतर गेल्या महिन्यात त्याने रणजी सामना खेळला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठीही तो उपलब्ध असेल.

‘‘भारतामध्ये खेळताना पाहुण्या संघांचा अंदाज अनेकदा चुकतो. सामना कोणत्याही दिशेला जात नाही, असे वाटत असतानाच परिस्थिती बदलते. भारतीय संघाला याची सवय आहे. ऑस्ट्रेलियन संघालाही या परिस्थितीशी लवकर जुळवून घ्यावे लागेल. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीसह मानसिकदृष्टय़ाही सर्व आव्हानांसाठी सज्ज असणे गरजेचे आहे. मी भारतातील अनेक कसोटी सामने पाहिले आहेत. तिथे तुमच्या शारीरिक क्षमतेइतकीच मानसिकतेचीही कसोटी लागते. भारतामध्ये जिंकण्यासाठी योग्य योजना, संयम आणि सातत्य या गोष्टी निर्णायक ठरतात,’’ असे चॅपल म्हणाले.

तसेच ऑस्ट्रेलियन संघाने ऑफ-स्पिनर नॅथन लायनसह डावखुरा फिरकीपटू अॅश्टन एगरला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान दिले पाहिजे, असे चॅपल यांना वाटते. ‘‘या मालिकेतील खेळपट्टय़ा फिरकीला अनुकूल असण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने एगरला संधी दिली पाहिले. एगरचा चेंडू फारशी फिरकी घेत नाही. मात्र, अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये ६१९ बळी मिळवले आणि त्याचा चेंडू क्वचितच खूप फिरकी घ्यायचा. सरळ दिशेला आणि फलंदाजाच्या शरीराच्या जवळ चेंडू टाकण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. रवींद्र जडेजाही अशाच प्रकारे गोलंदाजी करतो. एगर या दोघांचे अनुकरण करू शकेल,’’ असे चॅपल यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (९ फेब्रुवारी) नागपूर येथे खेळवला जाणार आहे.