HBD ‘SKY’ : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा ‘वर्ल्ड क्लास बॅट्समन’!

सू्र्यकुमारचा ‘स्टायलिश’ षटकार पाहून जोफ्रा आर्चरही चक्रावला होता.

happy birthday suryakumar yadav unknown facts about world class batsman
सूर्यकुमार यादव

भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आज १४ सप्टेंबर रोजी आपला ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. तो नुकताच आयपीएलसाठी इंग्लंडहून यूएईत परतला आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसोबत यांच्यासोबत तोही सध्या आयसोलेशनमध्ये आहे. अशा परिस्थितीत, तो त्याचा वाढदिवस त्याच्या मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्यांसोबत साजरा करू शकणार नाही. १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवेल. आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा नियमित सदस्य बनला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक दशकभर मेहनत केली आणि त्यानंतर त्याला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज

सूर्यकुमारने अखेर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. इशान किशनच्या दुखापतीने सूर्यकुमारसाठी संघाचे दरवाजे उघडले आणि जेव्हा त्याला फलंदाजीची संधी मिळाली, त्याने या सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्कार जिंकत ३१ चेंडूत ५७ धावा केल्या. सूर्यकुमारने पदार्पणात एक अविस्मरणीय विक्रम केला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. त्याने इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जोफ्रा आर्चरला हा षटकार ठोकला होता. त्याने खेळलेला फटका पाहून आर्चरही चक्रावला होता.

 

सूर्यकुमार यादवने २०१८ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससोबत चार वर्षे घालवली. २०१८मध्ये, केकेआरने कर्णधार गौतम गंभीर आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांना रिलीज केले. सूर्यकुमार केकेआरसोबत चार हंगामात तीन वर्षे उपकर्णधार होता. २०१८च्या मेगा लिलावात केआरने सूर्यकुमार यादवला खरेदी करण्याचा प्रयत्न केला, पण मुंबई इंडियन्सने ३.२ कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले.

 

हेही वाचा – IPL 2021 : नव्या वादाला होणार सुरुवात? कुलदीप यादवनं आपल्याच संघावर केले गंभीर आरोप!

मुंबई-कोलकाता-मुंबई

आयपीएल खेळण्यापूर्वी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावण्याचा सर्वात अनोखा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. त्याने २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्याच्या एक वर्ष आधी तो चॅम्पियन्स लीग टी-२० जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण २४ धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १३९ धावा केल्या. त्यांनी आरसीबीला ३१ धावांनी पराभूत करून जेतेपद पटकावले. दोन वर्षांनंतर, त्याने मुंबई इंडियन्ससोबत आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले. २०१४ मध्ये, तो केकेआरचा भाग होता, ज्यांनी अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.

 

सूर्यकुमार यादवने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला मागे टाकत आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय कामगिरीच्या जोरावर त्याला हे स्थान मिळाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Happy birthday suryakumar yadav unknown facts about world class batsman adn