ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडचा नऊ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर २०१९च्या विश्वचषक अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतला. यजमान भारताला या स्पर्धेतील पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने भारतीय खेळाडूंना खास सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, भारताला विश्वचषक जिंकायचा असेल तर खेळाडूंनी दोन महिने फोनपासून दूर राहावे.

२०११ च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान तत्कालीन टीम इंडियाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी एक नियम बनवला होता. संघातील कोणताही खेळाडू वर्तमानपत्र वाचणार नाही, असा नियम केला होता, अशी आठवण हरभजन सिंगने सांगितली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हरभजन म्हणाला की, क्रिकेटरच्या कोणत्याही खराब कामगिरीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका होते आणि त्याचा मानसिक परिणाम होऊ शकतो.

मी खेळाडूंना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देईन –

हरभजन सिंग एका मुलाखतीत म्हणाला, “तो काळ (२०११) वेगळा होता. वर्तमानपत्र न वाचून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. आता सर्व काही सोशल मीडियावर आहे. त्यावेळी गॅरी कर्स्टन यांनी एक नियम करून आम्हाला वर्तमानपत्र वाचण्यास मनाई केली होती. जर तुम्ही एखाद्या दिवशी चांगली कामगिरी केली नाही, तर लोक सोशल मीडियावर काय करतात ते तुम्हाला दिसेल. मी खेळाडूंना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देईन. पुढचे दोन महिने तुमचा फोन पाहू नका.”

हेही वाचा – Asian Games: भारतीय पुरुष कबड्डी संघाची कमाल! पाकिस्तानचा ६१-१४ अशा फरकाने धुव्वा उडवत गाठली अंतिम फेरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी, हरभजन म्हणाला होता की, सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी रविचंद्रन अश्विन हा सर्वोत्तम गोलंदाजी पर्यायांपैकी एक आहे. तसेच संघ व्यवस्थापनाने क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये त्याला खेळवण्याचा विचार करावा. हरभजन म्हणाला होता की, “कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे, हे लोकांना समजले आहे. ऑफस्पिनरने उजव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करू नये, असे नाही. विरोधी पक्षात जास्त डावखुरे फलंदाज असतील, तर अश्विनने खेळवावे, पण व्यवस्थापनाला तेच वाटते. मात्र, जर मी संघाचा कर्णधार असतो किंवा व्यवस्थापनाचा भाग असतो, तर मी माझे पाच सर्वोत्तम गोलंदाज निवडले असते आणि अश्विन त्या यादीत पहिला किंवा दुसरा असता.”