वृत्तसंस्था, नवी दिल्ली
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकल्याच्या काही महिन्यांतच रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदापासून दूर करण्याचा निवड समितीचा निर्णय धक्कादायक होता, अशी टिप्पणी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने केली. ऑस्ट्रेलियासारख्या आव्हानात्मक दौऱ्यापूर्वी नेतृत्वबदल करणे योग्य नव्हते, असेही हरभजनला वाटते.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने अनपेक्षित निर्णय घेताना रोहितला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढले. कसोटीपाठोपाठ एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा शुभमन गिलकडेच सोपविण्यात आली असून आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून तो ही जबाबदारी सांभाळेल. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने २०२७ च्या एकदिवसीय विश्चषकाच्या दृष्टीने संघबांधणीला आतापासूनच सुरुवात केली आहे. याचा भाग म्हणूनच ३८ वर्षीय रोहितच्या जागी नेतृत्वासाठी २६ वर्षीय गिलला पसंती देण्यात आल्याचे आगरकर यांनी सांगितले. मात्र, आगरकरांच्या मताशी हरभजन सहमत नाही.
‘‘सर्वप्रथम मी शुभमन गिलचे अभिनंदन करू इच्छितो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने कर्णधार म्हणून चांगली सुरुवात केली आहे. आता त्याला एकदिवसीय संघाचीही धुरा सोपविण्यात आली आहे. मी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. परंतु रोहितला कर्णधारपदापासून दूर करण्याचा निर्णय मला पटलेला नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून रोहितची कामगिरी अप्रतिम आहे. त्यामुळे रोहित यापुढे कर्णधार नसणार हा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता,’’ असे हरभजन म्हणाला.
‘‘तुम्ही रोहितची संघात निवड करत असाल, तर त्याला कर्णधार म्हणूनच निवडले पाहिजे. त्याने अलीकडेच भारताला चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकून दिली. केवळ मर्यादित षटकांबाबत बोलायचे, तर रोहित अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ आहे. त्याला किमान ऑस्ट्रेलिया दौऱ्यापुरते कर्णधार म्हणून कायम ठेवले पाहिजे होते. निवड समिती २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करत आहे हे मी जाणतो. मात्र, त्या स्पर्धेला अजून बराच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे इतक्या घाईने नेतृत्वबदल गरजेचा नव्हता,’’ असे हरभजनने नमूद केले.
‘‘एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी शुभमनला आता बराच वेळ मिळाला आहे. मला त्याच्यासाठी आनंदच आहे. मात्र, त्याला आणखी सहा महिने किंवा वर्षभराने ही जबाबदारी देणे अधिक योग्य ठरले असते. मी पुन्हा सांगतो की माझा शुभमनला अजिबातच विरोध नाही. परंतु मला रोहितसाठी वाईट वाटते आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो जवळपास ५० च्या सरासरीने धावा करत आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य असल्याचे यावरूनच अधोरेखित होते. आता कर्णधारपद काढण्यात आले याचा रोहितच्या खेळावर काही परिणाम होईल, असे मला वाटत नाही. तो दमदार कामगिरी करत राहील. तसेच शुभमनलाही महत्त्वाचे सल्ले देईल. त्यामुळे यापुढेही त्याची भूमिका महत्त्वाचीच असेल,’’ असेही हरभजन म्हणाला.
विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न -गिल
एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धा जिंकवून देण्याचे आपले स्वप्न असल्याचे शुभमन गिल म्हणाला. ‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये देशाचे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी सर्वांत मोठा सन्मान आहे. भारतीय संघाने गेल्या काही वर्षांपासून यशस्वी कामगिरी केली आहे. आता या संघाचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,’’ असे गिलने सांगितले. ‘‘२०२७ साली दक्षिण आफ्रिकेत होणारा विश्वचषक जिंकणे हे आमचे स्वप्न आहे. या पुढील सर्व सामने आम्ही ते उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनच खेळू. आम्हाला आणखी साधारण २० एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. त्यात सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषकासाठी सज्ज असण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्ही विश्वचषक जिंकू अशी आशा आहे,’’ असेही गिल म्हणाला.
‘श्रेयसला पुरेसे श्रेय दिले जात नाही’
निवड समितीने गिलला कर्णधारपदी बढती देताना एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली. ही निवड योग्यच असल्याचे हरभजनला वाटते. ‘‘श्रेयसला पुरेसे श्रेय दिले जात नाही. भारतात २०२३ साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात श्रेयसने दोन सलग शतके साकारली होती, तीही अगदी आक्रमक शैलीत खेळताना, संघहिताचा विचार करून. मात्र, त्याच्याबाबत फारशी चर्चा केली जात नाही. तो चांगल्या लयीत असतो, तेव्हा अन्य फलंदाजांचे काम सोपे होते. आता तो भारतीय संघात परतला आहे याचा मला आनंद आहे. त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय योग्यच आहे. आता तो आणि शुभमन गिल मिळून भारतीय क्रिकेटला आणखी मोठ्या उंचीवर नेतील अशी आशा आहे,’’ असे हरभजनने नमूद केले.