Harbhajan Singh on Rohit Sharma ODI Captaincy: ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या वनडे आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. यात एकदिवसीय सामन्यासाठी आता रोहित शर्माऐवजी कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे देण्यात आल्याचे जाहीर केले. काही दिवसांपूर्वीच गिलकडे कसोटी क्रिकेटचीही धुरा देण्यात आली होती. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माला नेतृत्वापासून दूर करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असताना आता माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश करण्यात आला आहे. सात महिन्यांनंतर दोघेही क्रिकेटच्या मैदानावर एकत्र दिसणार आहेत. शुबमन गिलला कर्णधार पद देताच क्रिकेट वर्तुळात उत्साह आणि नाराजी असे संमिश्र वातावरण दिसत आहे.
यावर व्यक्त होताना हरभजन सिंगने शुबमन गिलला संधी दिल्याबद्दल त्याचे कौतुक केले. “कसोटी क्रिकेटमध्ये गिलने चांगली कामगिरी केली. आता त्याच्यावर वनडेचीही जबाबदारी देण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन”, असे हरजभजन सिंगने जिओ हॉटस्टारवर बोलताना म्हटले.
परंतु रोहित शर्माला हटवणे धक्कादायक
शुबमन गिलचे कौतुक केले असले तरी रोहित शर्माला इतक्यात बाजूला केल्याबद्दल हरभजन सिंगने आश्चर्य व्यक्त केले. “रोहित शर्माचा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. रोहित शर्मा संघात असताना त्याला कर्णधार पदावरून बाजूला करणे हे धक्कादायक आहे”, असे हरभजन सिंगने म्हटले.
हरभजन सिंग पुढे म्हणाला, जर रोहित ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे तर तो कर्णधार म्हणून जाईल. त्याने नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये खेळण्याची त्याला आणखी एक संधी दिली जाईल, असे मला वाटले होते.
शुबमन गिल अजून थोडा वेळ वाट पाहू शकला असता
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आणखी काही वेळ बाकी आहे. त्यामुळे शुबमन गिल आणखी वर्षभराने ही जबाबदारी घेऊ शकला असता, असेही हरभजनने म्हटले. “जर तुम्ही २०२७ च्या विश्वचषकाचा विचार करत असाल तर त्याला पुरेसा वेळ बाकी आहे. शुबमन गिल अजून थोडी वाट पाहू शकला असता. कदाचित ६-७ महिने किंवा वर्षभरानंतर त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली असती. एकूणच शुबमनसाठी मी आनंदी आहेच. पण रोहित शर्मा कर्णधार नसल्यामुळे थोडा निराश झालो आहे”, अशी प्रतिक्रिया हरभजन सिंगने दिली.