Gautam Gambhir: शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ २- १ ने पिछाडीवर आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरच्या हाती सोपवण्यात आली आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हरभजन सिंगचा बीसीसीआयला सल्ला
राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये टी -२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. पण मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका गमावली. त्यामुळे हरभजन सिंगने बीसीसीआयला कसोटी क्रिकेटसाठी वेगळा आणि वनडे, टी -२० साठी वेगवेगळा मुख्य प्रशिक्षक निवडण्याचा सल्ला दिला आहे.
हरभजन सिंग म्हणाला, “जर हा नियम लागू केला गेला तर यात काहीच चुकीचं नसेल. आता प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा संघ आणि वेगळे खेळाडू असतात. मग वेगळा मुख्य प्रशिक्षक असायला काहीच हरकत नाही. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकावर असलेल्या कामाचा ताण कमी होईल. हे झालं तर बरंच होईल.”
तसेच तो पुढे म्हणाला, “ मुख्य प्रशिक्षकालाही एखाद्या दौऱ्यावर जाण्यासाठी वेळ हवा असतो. कधी ऑस्ट्रेलिया तर कधी इंग्लंड. त्यामुळे प्रशिक्षकाला विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल की, त्याला संघ कसा करायचा आहे. हीच गोष्ट मर्यादित षटकांच्या मुख्य प्रशिक्षकासाठीही लागू होईल. त्यालाही संघ बांधणीसाठी विचार करायला पुरेसा वेळ मिळेल.”
तसेच तो पुढे म्हणाला, ” जर एकाच प्रशिक्षकावर इतकं ओझं असेल, तर त्याचंही कुटुंब आहे, काही जबाबदाऱ्या आहेत. सतत कुटुंबासह प्रवास करणं सोपं नसतं. त्यामुळे मला तरी हेच वाटतं की, कसोटी क्रिकेटसाठी वेगळा आणि वनडे, टी-२० साठी वेगळा प्रशिक्षक असायला हवा.”