भारतीय क्रिकेट संघातील ‘पंड्या ब्रदर्स’ म्हणजेच हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात मोठे योगदान दिले आहे. भारतात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने भयावह परिस्थिती निर्माण केली असून दररोज लाखो करोनारुग्णांची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे अनेकांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे कठीण होत आहे. अशातच हार्दिक आणि कृणालने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पुरवण्याचा निर्णय घेतला.

भारताकडून एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळणारा क्रुणाल पंड्याने आज सोमवारी ट्विटरद्वारे ही माहिती शेअर केली. ”सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची एक नवीन तुकडी कोविड सेंटरला पाठविली जात आहे”, असे कृणालने म्हटले. हार्दिकनेही यासंदर्भात सोशल मीडियावर ट्वीट केले आहे. तो म्हणाला, ”आपण ही कठोर लढाई लढत आहोत आणि एकत्रितपणे आपण ही लढाई जिंकू शकतो.”

 

देशातील ग्रामीण भागात २०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर पाठवले जातील, असे हार्दिकने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते. हार्दिक आणि क्रुणाल दोघेही टीम इंडियाकडून खेळतात. हे दोन भाऊ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही एकत्र खेळतात. भारताकडून हार्दिकने तिन्ही प्रकारात क्रिकेट खेळले आहे, तर क्रुणालला अजून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही.

विराट कोहलीचा ‘किलर’ लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल!