गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं. माझ्यावर अन्यायही झाला पण मी बोललो नाही. माझा दिवस येईलच याची मला खात्री होती. विश्वविजयी भारतीय संघाचा भाग झालो हा विलक्षण आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे असं अष्टपैलू हार्दिक पंड्याने सांगितलं. हार्दिकने शेवटचं षटकात १६ धावांचा यशस्वी बचाव केला. भारताने सामना जिंकताच हार्दिकच्या अश्रूंचा बांध फुटला. सामन्यानंतर बोलताना हार्दिकने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हार्दिक म्हणाला, ‘माझ्यासाठी हा अतिशय भावुक करणारा क्षण आहे. काहीतरी कुठेतरी चुकत होतं. पण आजचा दिवस खास होता. अख्खा देश भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होता. गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात जे जे घडलं ते पाहता हा विजय माझ्यासाठी विलक्षण असा आहे. मी कशाबद्दलही एक अक्षरही बोललो नाही. माझ्यावर अन्याय झाला. पण मला माहिती होतं की माझा दिवस येईलच. वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत, देशाच्या विजयात योगदान देता येण्यासारखा दुसरा आनंद नाही. आम्ही गेले वर्ष यासाठी कसून मेहनत करत होतो. आम्ही शांतचित्ताने फायनलमध्ये खेळलो. दडपणाने खचून गेलो नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये कशी बॉलिंग करायची याची तयारी केली होती. माझा रनअपचा स्पीड अचानकच वाढला. मी याआधीही अशा परिस्थितीत गोलंदाजी केली आहे, तो अनुभव कामी आला’.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेपूर्वी मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने हार्दिक पंड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. मुंबई इंडियन्स संघाला पाच जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला केल्याने हार्दिकला मैदानात, सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. हार्दिकने या कशावरही व्यक्त झाला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही महिन्यात हार्दिक आणि त्याची पत्नी याच्यात सगळं आलबेल नसल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्याबाबतही हार्दिक काहीही बोलला नाही. मुंबई इंडियन्सची कामगिरीही यथातथाच राहिल्याने हार्दिकवर टीका होत राहिली. वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिकने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केलं.