Hardik Pandya Grand Welcome in Vadodara: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २९ जून रोजी, टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन टीम इंडिया ४ जुलै रोजी भारतात परतली, तेव्हा त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. आणि हा विजय मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. त्याचवेळी, आता हार्दिक पंड्या त्याच्या मूळ गावी बडोदा येथे पोहोचला आहे, जिथे चाहते त्याचे भव्य स्वागत करण्यासाठी आले होते. चॅम्पियन खेळाडूच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर रस्त्यावर उतरले आहे, अशी गर्दी पाहताना दिसते. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बडोद्यात हार्दिक पंड्याची विजयी परेड –

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघातील महत्त्वाचा सदस्य हार्दिक पंड्या बडोदा येथील त्याच्या घरी पोहोचला, तेव्हा तेथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. चॅम्पियनच्या स्वागतासाठी चाहत्यांनी जय्यत तयारी केली होती. हार्दिकच्या स्वागतासाठी मुंबईप्रमाणेच खुल्या बसमधून विजयी परेड काढण्यात आली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही गर्दी पाहू शकता. हे दृश्य पाहून हार्दिकला मरीन ड्राइव्ह ते वानखेडेपर्यंतच्या विजय परेडची आठवण झाली असेल.

हार्दिक पंड्याने विजय परेड दरम्यान भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती. एकीकडे क्रिकेट चाहते हार्दिक-हार्दिकच्या घोषणा देत होते, तर दुसरीकडे हा स्टार क्रिकेटरही हस्तांदोलन करून शुभेच्छा स्वीकारत होता. विजय परेडमध्ये हार्दिकने तिरंगाही फडकवला. हार्दिक ज्या खुल्या बसमधून विजय परेडसाठी प्रवास करत होता, त्यावर ‘हार्दिक पंड्या प्राइड ऑफ बडोदा’ असे लिहिलेला बॅनर देखील होता. हार्दिकबरोबर त्याचा भाऊ कृणाल पंड्याही या बसमध्ये उपस्थित होता.

हेही वाचा – David Warner : ‘…म्हणून डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळले’, मुख्य निवडकर्त्याने सांगितले कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंत अंबानीच्या लग्नानंतर हार्दिक पंड्या घरी परतला –

४ जुलै रोजी टीम इंडिया भारतात परतल्यानंतर हार्दिक पंड्या मुंबईतच होता. तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या सर्व फंक्शन्सचा आनंद लुटताना दिसला. या लग्नात त्याने भरपूर डान्सही केला. हार्दिक आता २७ जुलैपासून श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.