Hardik Pandya Natasa Stankovic: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्या गेल्या काही काळापासून चर्चेचा मोठा विषय आहे. आयपीएल २०२४ मध्ये त्याची कामगिरी खूपच निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना हार्दिक फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये फ्लॉप ठरला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली पाच वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स १७व्या हंगामात सुमार कामगिरीसह तळाशी राहिली. आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकमध्ये काहीतरी बिनसले आहे. कदाचित दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. नताशा गेल्या काही दिवसांपासून लाइमलाईटपासून दूर आहे. हार्दिकच्या आयपीएल कामगिरीवरून अभिनेत्रीलाही ऑनलाइन धमकी देण्यात आली होती. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या लग्नाला ४ वर्षे झाली आहेत. नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा विवाह ३१ मे २०२० रोजी झाला होता आणि त्याच वर्षी ३० जुलै रोजी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला होता.

हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्रामवरून पंड्या आडनाव काढले आहे. यामुळेच सोशल मीडियावर लोक त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, यावर या जोडप्याने अद्याप कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही.

Natasa Stankovic Instagram bio

रेडिटवर पोस्ट व्हायरल

Reddit वर नताशा आणि हार्दिक वेगळे झाले आहेत का अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. कोणीतरी मंगळवारी Reddit वर अशी पोस्ट शेअर केली आहे. या दोघांच्या वागण्यानेही या चर्चेला अधिक खत पाणी मिळत आहे. हे दोघेही इंस्टाग्राम स्टोरीवर एकमेकांबद्दल काहीच पोस्ट करताना दिसले नाहीत. याआधी नताशाच्या इंस्टाग्रामवर नताशा स्टॅनकोविक पांड्या असे लिहिले होते, पण आता तिने हे आडनाव काढून टाकले आहे.

रेडिटवरील व्हायरल पोस्ट

रेडिटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हा केवळ एक अंदाज आहे. पण दोघेही एकमेकांबद्दल इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत नाहीत. पूर्वी नताशाच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नताशा स्टॅनकोविक पड्या अस होतं. पण आता तिने ते नाव काढून टाकले आहे. तिचा वाढदिवस ४ मार्च रोजी होता आणि त्या दिवशी हार्दिकने कोणतीही पोस्ट केली नाही, तिने अगस्त्य सोबत असलेल्या पोस्ट वगळता तिच्या आणि हार्दिकच्या अलीकडील काही पोस्ट डिलीट केल्या. तसेच ती यावर्षी आयपीएलच्या स्टँडमध्ये किंवा संघासंबंधीच्या कोणत्याही पोस्टमध्ये दिसली नाही. कृणाल आणि पंखुरी अजूनही तिच्या पोस्टवर कमेंट करतात पण हार्दिक आणि नताशामध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं आहे.”

गेला काही काळ हा हार्दिकसाठी फारसा चांगला राहिलेला नाही. वनडे वर्ल्डकपदरम्यान हार्दिकला दुखापत झाल्याने तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिकने आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन केले. यासह मुंबई इंडियन्सने पंड्याला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करत मुंबईच्या संघात सामील केले. फक्त मुंबईच्या ताफ्यात सामीलच केले नाही तर त्याला संघाचे कर्णधारपदही दिले. रोहित शर्माकडून संघाचे कर्णधारपद काढून घेत हार्दिकला दिल्याने त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ज्याचा परिणाम त्याच्या खेळावरही दिसून आला. आता यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही सारं काही अलबेल नसल्याची मोठी माहिती समोर आली आहे.