मुंबई : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान घोटयाला दुखापत झाल्यावर तंदुरुस्त होण्यासाठी एकामागून एक घाईघाईने उपचार केले. मात्र, याचा विपरीत परिणाम झाला आणि दुखापत बळावल्याने मला विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकावे लागले, अशी कबुली भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंडयाने दिली.

गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील भारतीय संघाच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध पुणे येथे स्वत:च्याच गोलंदाजीवर चेंडू अडवताना हार्दिकच्या घोटयाला दुखापत झाली. त्याला फिजिओच्या साहाय्यानेच मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर त्याला पुन्हा या स्पर्धेत खेळता आले नाही.

हेही वाचा >>> ऑलिम्पिक निवड चाचणीत दीपिका कुमारी अव्वल

‘‘विश्वचषकासारख्या मोठया स्पर्धेला मला मुकायचे नव्हते. त्यामुळे मला घोटयावर विविध तीन ठिकाणी इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतरही घोटयाची सूज कमी होत नव्हती. त्यामुळे रक्ताच्या गुठळयाही काढण्याचा उपाय करण्यात आला. मात्र, या सगळयामुळे दुखापत बरी होण्यापेक्षा अधिक बळावली,’’ असे हार्दिक म्हणाला.

‘‘देशासाठी खेळायला मिळणे हा सर्वात मोठा मान असल्याचे मी मानतो. त्यामुळे मी स्वत:ला मैदानाबाहेर बघू शकत नव्हतो. झटपट तंदुरुस्त होण्याचा मी प्रयत्न करत होतो. मला चालता येत नव्हते, तेव्हा मी पळण्याचा प्रयत्न करत होतो. आपण तंदुरुस्त होण्याची घाई करत आहोत, याचे प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील हे माहीत असूनही मी हा धोका पत्करण्यास तयार होतो. मला काहीही करून खेळायचे होते, मात्र याचा परिणाम उलटाच झाला. माझी दुखापत अधिक बळावत गेली.

१५-२० दिवसांत बरी होणारी दुखापत तीन महिन्यांची झाली. यामुळे मला चार सामन्यांनंतर विश्वचषक स्पर्धेत खेळता आले नाही याची खंत कायम वाटेल,’’ असेही हार्दिक म्हणाला.