पीटीआय, कोलकाता
हार्दिक पंडय़ा वेगवान गोलंदाजी करणाऱ्या सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू लान्स क्लूजनरने व्यक्त केले. तसेच हार्दिकने अधिक कसोटी सामने खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, असेही क्लूजनरला वाटते.गेल्या काही वर्षांत विविध दुखापतींचा सामना करावा लागलेल्या हार्दिकने सप्टेंबर २०१८ मध्ये भारतासाठी अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले होते.




‘‘हार्दिक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो तंदुरुस्त राहिल्यास आणि सातत्याने १३५ किमीपेक्षा अधिकच्या वेगाने गोलंदाजी करत असल्यास, त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे कोणालाही आव्हानात्मक ठरेल. माझ्या मते, तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे,’’ असे क्लूजनरने नमूद केले.
तसेच हार्दिकने कसोटी क्रिकेटकडे लवकर पाठ फिरवली का, असे विचारले असता क्लूजनर म्हणाला, ‘‘हो. त्याला अधिक कसोटी सामने खेळणे कदाचित शक्य झाले असते. कसोटी हा क्रिकेटचा सर्वोच्च प्रकार आहे. तिथे क्रिकेटपटू म्हणून तुमची खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ लागते. कसोटी क्रिकेटमध्ये फारसा बदल झालेला नाही. आता काळ पुढे सरकला आहे इतकेच.’’
त्याचप्रमाणे सातत्याने १३५ किमीहून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या आणि फलंदाजीत योगदान देणाऱ्या खेळाडूलाच वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हटले पाहिजे, असे क्लूजनरने स्पष्ट केले.
भारताची फलंदाजी विरुद्ध ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी!
आगामी ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोणता संघ बाजी मारणार हे सांगणे अवघड असल्याचे क्लूजनर म्हणाला. ‘‘भारताची फलंदाजी विरुद्ध ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी, हे द्वंद्व जो जिंकेल, तो संघ विजयी ठरेल,’’ असे क्लूजनरने सांगितले. इंग्लंडमध्ये होणारा हा सामना जिंकण्यात भारतीय संघ सक्षम असल्याचेही क्लूजनर म्हणाला.