Harmanpreet Kaur Angry Fight With Bangladesh: टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बांगलादेश विरुद्ध शेवटच्या एक दिवसीय सामन्यात बाद झाल्यावर हरमनप्रीतने दिलेली प्रतिक्रिया पाहून चाहतेही नाराज झाले होते. काही व्हायरल ट्वीटनुसार हरमनने आधी बॅटने स्टंप उडवले आणि मग बांगलादेशच्या चाहत्यांना सुद्धा ‘मधलं बोट’ दाखवून मैदानातून बाहेर पडली. पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये सुद्धा हरमनने उद्दामपणा केल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हरमनच्या वागण्यामुळे बांगलादेशची कर्णधार सुद्धा आपल्या संघाला घेऊन मैदानातून निघून गेली होती, आता या एकूण प्रकरणावर बांग्लादेशची कर्णधार निगार सुल्ताना हिने मौन सोडले आहे.
IND vs BAN नंतर फोटोसेशन मध्ये घडलं काय?
मालिका अनिर्णीत संपल्याने, आणि ट्रॉफी दोन्ही संघांना देण्यात आली. भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंना सामन्यानंतरच्या सादरीकरणाच्या शेवटी फोटोसाठी बोलावण्यात आले. हरमनप्रीत उपहासात्मकपणे पंचांना सुद्धा ट्रॉफी घेण्यासाठी बोलावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, भारतीय कर्णधार फोटो सत्रादरम्यान बांगलादेश संघाची थट्टा करत टाळ्या वाजवून चिडवताना तसेच पंचमुळे संघाला ट्रॉफी मिळत असलयाचे सुचवताना दिसत आहे. हे पाहून बांगलादेशच्या कर्णधाराने संघासह मैदान सोडले होते.
बांगलादेशची कर्णधार काय म्हणाली?
“हा तिचा प्रॉब्लेम आहे, मला याच्याशी काही देणेघेणे नाही. एक खेळाडू म्हणून, ती अधिक चांगली वागणूक दाखवू शकली असती. काय झाले ते मी सांगू शकत नाही, परंतु माझ्या संघासह मला तिथे [फोटोसाठी] उभे राहायची इच्छाही झाली नाही, योग्यही वाटले नाही, म्हणूनच आम्ही परतलो. क्रिकेट हा शिस्तीचा आणि आदराचा खेळ आहे. “
अंपायरिंगबद्दल निगार म्हणाली की, “ती (हरमन) आऊट झाली नसती तर पंचांनी तिला आऊट का दिले असते? त्या मॅचसाठी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पंच होते, त्यामुळे ते अनुवभवी व अभ्यासू असतील यात शंका नाही हरमनप्रीत आणि मेघना वगळून सहा जण जेव्हा बाद झाले आता यावरही भारत आक्षेप घेणार का? अंतिम निर्णयाचा आम्ही आदर करतो मग तो आम्हाला आवडूदे किंवा नावडूदे. आम्ही भारतीय खेळाडूंप्रमाणे वागत नाही.”
हे ही वाचा<< हरमनप्रीत कौरचे ‘हे’ दोन वादग्रस्त Video पाहून चाहत्यांचा संताप; म्हणाले, “हिला आयुष्यभरासाठी बॅन करा”
दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर आयसीसीने हरमनप्रीत कौरवर मॅचच्या फीच्या ७५ टक्के दंड ठोठावला आहे. एरवी संघाच्या बाजूने भक्कम उभे राहणारे फॅन्स सुद्धा आता हरमनप्रीत कौरच्या वागण्याने नाराज झाले आहेत, इतकंच नव्हे तर ट्विटर पासून ते सर्वच सोशल मीडियावर हरमनप्रीत कौरला आयुष्यभरासाठी क्रिकेटमधून बॅन करा अशीही मागणी होत आहे.