Indian Women’s Team Interaction with PM Narendra Modi: भारतीय संघाने भारतात खेळवण्यात आलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चं जेतेपद पटकावलं. महिला संघाने पहिल्यांदाच विश्वचषकाचं जेतेपद आपल्या नावे केलं आणि यानंतर वर्ल्ड चॅम्पियन संघ पंतप्रधान मोदींची खास भेट घेण्यासाठी पोहोचला. यादरम्यान मोदींच्या निवासस्थानी संपूर्ण संघाची खास व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण संघाशी पंतप्रधानांनी खास भेट घेतली आणि संवादही साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भेटीदरम्यान टीम इंडियाची आंतराराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, त्यानंतर वर्ल्डकप मोहिम तसेच संघातील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत संवाद साधला. यादरम्यान त्यांनी हरमनप्रीत कौरला तिने टिपलेल्या शेवटच्या झेलबद्दल विचारलं आणि तो झेल टिपल्यानंतर हरमनने चेंडू स्वत:च्या खिशात ठेवला होता.

दक्षिण आफ्रिका संघाने ४ षटकांत ९ विकेट्स गमावल्या होत्या आणि आता भारताला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी फक्त एका विकेटची गरज होती. यानंतर हरमनने ४६वं षटक टाकण्याची जबाबदारी दीप्ती शर्माकडे दिली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ४ षटकांत ५२ धावांची गरज होती.

दीप्तीने पहिल्या दोन्ही चेंडूंवर एकही धाव दिली नाही. त्यामुळे स्ट्राईकवर असलेल्या नादिन दे क्लार्कला पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याची गरज होती. त्यामुळे दीप्तीच्या फुल टॉस बॉलवर तिने मोठा फटका मारला आणि एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने गेला. तिथे उभ्या असलेल्या हरमनने मागे धावत जाऊन हवेत उडी मारताना कमालीचा झेल टिपला आणि दक्षिण आफ्रिका संघ सर्वबाद होत भारतीय संघ पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन ठरला. हरमनने विजयाचा आनंद साजरा करताना शेवटपर्यंत तो चेंडू सोडला नाही आणि काही वेळाने तो चेंडू तिने तिच्या खिशात ठेवला.

हरमनप्रीतने अखेरचा झेल टिपलेला चेंडू खिशात ठेवण्यासाठी तिला कोणी सांगितलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरमनप्रीत कौरला याबाबत प्रश्न विचारला. पंतप्रधान म्हणाले, “जिंकल्यानंतर तो चेंडू खिशात ठेवला, त्यामागे काय विचार होता? असं करायला तुला कोणी सांगितलं होतं का, की नेमकं काय झालं?”

हरमनप्रीत कौर यावर उत्तर देताना म्हणाली, “अजूनही तो चेंडू माझ्याकडे आहे. खरंतर ही देवाची इच्छा होती. असं तर काही नक्की नव्हतं की शेवटचा कॅच माझ्याकडेच येईल. तो चेंडू माझ्या दिशेने आला आणि बस्स… इतक्या वर्षांची प्रतिक्षा, मेहनत होती. त्यामुळे असं झालं की तो चेंडू माझ्याकडे आला आहे, तर हा चेंडू आता माझ्याकडेच राहणार आहे. आताही तो चेंडू माझ्या बॅगमध्ये आहे.”

पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भारतीय संघाची, सपोर्ट स्टाफची खास भेट घेतली आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेवर त्यांनी बारकाईने लक्ष दिलं आणि प्रत्येकाशी संवाद साधत त्यांचं कौतुकही केलं.