Harmanpreet Kaur Instagram Post: भारतीय महिला संघाला विश्वचषक जिंकून देणारी पहिली महिला कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौरचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जात आहे. २ नोव्हेंबरला नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला आणि यासह विश्वचषक विजयाची प्रतिक्षा संपली. विशेषतः हरमनप्रीत कौरची मेहनत यशस्वी झाली, जिने खेळाडू आणि कर्णधार म्हणून १२ आयसीसी स्पर्धांमध्ये अपयशी पाहिल्यानंतर १३व्या स्पर्धेत जेतेपद पटकावलं. यानंतर तिने पहिली पोस्ट शेअर केली आहे.

हरमनप्रीत कौरनेच अखेरचा झेल टिपत दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद करण्यावर मोहोर उमटवली आणि जेतेपद भारताच्या नावे केली. हरमनने अखेरपर्यंत झेल टिपलेला तो चेंडू हातात धरून ठेवला होता. या विजयानंतर हरमनप्रीत कौर खूप आनंदी आणि भावनिक दिसत होती आणि तिने एक खास टी-शर्ट घालून संपूर्ण जगाला संदेश दिला.

हरमनप्रीत कौरने ३ नोव्हेंबरला सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती विश्वचषक ट्रॉफीसह झोपलेली दिसत आहे. तिने घातलेल्या टी-शर्टवर एक खास संदेश लिहिलेला होता: “क्रिकेट हा जेन्टलमेनचा खेळ नाही, तो सर्वांचा खेळ आहे.” हरमनप्रीत कौरच्या मते, हा खेळ कोणीही जिंकू शकतो; एकच संघ तो वारंवार जिंकेल असं नाही. कठोर परिश्रमाने, कोणीही विश्वविजेता देखील बनू शकतो, जे हरमनप्रीतच्या संघाने साध्य केलं.

हरमनप्रीतने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “काही स्वप्न ही एकत्रित करोडो लोक पाहतात, त्यामुळेच क्रिकेट सर्वांचा खेळ आहे.” कर्णधार हरमनप्रीत कौरची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरने फलंदाजीने प्रभावी कामगिरी केली नसली तरी तिने २० धावा केल्या, पण कर्णधार म्हणून तिची कामगिरी प्रभावी होती. हरमनप्रीत कौरने संपूर्ण स्पर्धेतही संघाचं उत्कृष्ट नेतृत्त्व केलं. तर अंतिम सामन्यात तिने गोलंदाजीत केलेल्या बदलामुळे भारतीय संघाचा विजय निश्चित झाला.

हरमनने सामन्यात एक असा बदल केला, ज्यामुळे सुरुवातीला सर्वांना आश्चर्य वाटलं, पण हरमनचा हा जुगार मात्र यशस्वी ठरला. खरं तर, हरमनप्रीतने २१ व्या षटकात पार्ट टाईम गोलंदाज शफाली वर्माकडे चेंडू सोपवला आणि तिने येताच दुसऱ्या चेंडूवर सूने लुसची आणि दुसऱ्या षटकात अष्टपैलू मॅचविनर मारिजन कॅपची विकेट घेतली आणि सामना फिरवला. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्व्हार्डवर या दोन विकेट्स पडल्यानंतर दबाव वाढला आणि शतक झळकावूनही ती तिच्या संघाला सामना जिंकून देऊ शकली नाही.