Harmanpreet Kaur Viral Video INDW vs PAKW: भारताच्या महिला संघाने वनडे विश्वचषक २०२५ मध्ये पाकिस्तानचा ८८ धावांनी दणदणीत पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारताचा पाकिस्तानविरूद्ध १२-० असा अजेय रेकॉर्डही यासह कायम राहिला आहे. या सामन्यादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची फिरकीपटू नश्रा संधू यांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौर एक नजर ज्याप्रमाणे पाकिस्तानी खेळाडूकडे पाहत त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हरमनने रागात पाहणाऱ्या नश्रा संधूकडे पुढे जाईपर्यंत एक टक पाहत राहिली आणि त्यानंतर ती काहीतरी बोलताना दिसत आहे.
हरमनप्रीत कौरने रागात पाहणाऱ्या नश्रा सिंधूला दाखवली आपली जागा
सामन्यादरम्यान, पाकिस्तानी गोलंदाज नश्रा संधूने हरमनप्रीतला उकसावण्याचा प्रयत्न केला, परंतु हरमनप्रीत तिच्या जागेवर मैदानात शांतपणे उभी राहिली आणि तिच्याकडे शेवटपर्यंत तीक्ष्ण नजरेने पाहताना दिसत आहे आणि यानंतर ती काहीतरी बोलताना दिसत आहे. ‘डोळे दाखवते काय’, असं हरमन म्हणत असल्याचे चाहते कमेंट्समध्ये सांगत आहेत.
हरमनप्रीत आपल्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. हरमनचा तोच अंदाज मैदानावर दिसला. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याच्या तयारीने येणारी हरमन विकेटदरम्यान एकेरी दुहेरी धावा काढण्यात पटाईत आहे. हरमन पाकिस्तानविरूद्ध सामन्यात अवघ्या १९ धावा करत बाद झाली. २५ व्या षटकात हरमनप्रीत कौर १९ धावांवर बाद झाली, तिला डायना बेगने यष्टीरक्षक सिद्रा नवाजकरवी झेलबाद केलं. हरमननंतर इतर फलंदाजांनी संघाचा डाव सावरत धावसंख्या २४७ धावांपर्यंत नेली. रिचा घोषने भारताकडून अखेरच्या षटकांमध्ये चांगली फटकेबाजी केली.
पाकिस्तानच्या संघाकडून फलंदाज सिद्रा अमीनने मोठी खेळी केली आणि संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय गोलंदाजीपुढे इतर कोणतेच पाकिस्तानचे फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. पाकिस्तानच्या ८ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आली नाही. तर सलामीवीर मुनीबा अली वादग्रस्तरित्या धावबाद झाली.
भारताकडून सामनावीर ठरलेल्या क्रांती गौडने ३ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. तर तिच्याबरोबर फिरकीपटू दीप्ती शर्माने ३ आणि स्नेह राणाने २ विकेट्स घेतले. तर दीप्तीने मुनीबाला धावबाद केलं आणि हरमनप्रीत कमालीच्या थ्रोवर डायना बेगला धावबाद करत माघारी धाडलं.