IND vs ENG: क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक भारतीय संघाविरूद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ९९ धावांवर माघारी परतला. तो स्वस्तात माघारी परतला असता, पण झेल सुटल्यामुळे त्याला जीवदान मिळालं. त्याला शतक झळकावण्याची संधी मिळाली होती, पण तो ९९ धावांवर असताना झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या डावात तो शून्यावर माघारी परतला. या डावात शून्यावर बाद होताच त्याच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.
दुसऱ्या डावात शून्यावर बाद
या सामन्यातील पहिल्या डावात ९९ धावा केल्यानंतर हॅरी ब्रुककडून दुसऱ्या डावात चांगल्या सुरूवातीची अपेक्षा होती. पण त्याला हवी तशी सुरूवात करता आली नाही.सामन्यातील ५५ वे षटक टाकण्यासाठी शार्दुल ठाकूर गोलंदाजीला आला. या षटकात शार्दुलने बेन डकेटला १४९ धावांवर बाद करत माघारी धाडलं. डकेट बाद होताच हॅरी ब्रुक मैदानात आला. त्याचा सेट होण्यासाठी वेळ मिळणार, इतक्यात शार्दुलने लेग स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला. या चेंडूवर हॅरी ब्रुक ऋषभ पंतच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. यासह हॅरी ब्रुकच्या नावे असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे, जो कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात याआधी कधील बनवला गेला नव्हता.
कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
हॅरी ब्रुक हा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात ९९ आणि दुसऱ्या डावात शून्यावर बाद होणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी पंकज रॉय, मुश्ताक मोहम्मद, बाबर आझम आणि मिस्बाह उल हक हे फलंदाज पहिल्या डावात ९९ आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शून्यावर बाद झाले आहेत. यासह हॅरी ब्रुकच्या नावे आणखी एका नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो पहिल्या डावात ९९ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात गोल्डन डकवर बाद होणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमधील पहिल्या डावात ९९ आणि दुसऱ्या डावात शून्यावर बाद होणारे फलंदाज
पंकज रॉय (भारत) विरूद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली, १९५९
मुश्ताक मोहम्मद ( पाकिस्तान ) विरूद्ध इंग्लंड, कराची, १९७३
मिस्बाह उल हक ( पाकिस्तान) विरूद्धव वेस्टइंडिज, बारबाडोस, २०१७
बाबर आझम ( पाकिस्तान) विरूद्ध ऑस्टेलिया, अबू धाबी, २०१८
ह्रॅरी ब्रुक (इंग्लंड) विरद्ध भार, लीड्स, २०२५