दुबई : पर्पल कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेल्या हर्षल पटेलने (४/१७) मिळवलेली हॅट्ट्रिक आणि ग्लेन मॅक्सवेल (५६ धावा), कर्णधार विराट कोहली (५१) यांनी केलेल्या उत्तम फलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रविवारी मुंबई इंडियन्सला ५४ धावांनी धूळ चारली.

बेंगळूरुने दिलेले १६६ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचा डाव १८.१ षटकांत १११ धावांत संपुष्टात आला. या पराभवामुळे मुंबईची गुणतालिकेत सातव्या स्थानी घसरण झाली. तर सलग तीन सामने गमावल्यानंतर विजय मिळवणाऱ्या बेंगळूरुने (१० सामन्यांत १२ गुण) तिसरे स्थान कायम राखले.

रोहित शर्मा (४३) आणि क्विंटन डीकॉक (२४) यांनी ५७ धावांची सलामी दिल्यानंतरही मुंबईच्या मधल्या फळीने निराशा केली. त्यामुळे पुढील ५४ धावांत मुंबईचा डाव आटोपला.

हर्षलने १७व्या षटकात हार्दिक पंडय़ा (३), किरॉन पोलार्ड (७) आणि राहुल चहर (०) यांना बाद करून हॅट्ट्रिक साकारली. ‘आयपीएल’मध्ये बेंगळूरुसाठी हॅट्ट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी प्रवीण कुमार आणि सॅम्युएल बद्री यांनी अशी कामगिरी केली आहे. हर्षलनेच अ‍ॅडम मिल्नेचा (०) त्रिफळा उडवून बेंगळूरुच्या सहाव्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईचा हा मात्र सलग तिसरा पराभव ठरला.

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट