‘वर्ल्डकप फायनलमध्ये शेवटची ओव्हर अतिशय आव्हानात्मक होती. त्या ओव्हरसाठी हार्दिकला हॅट्स ऑफ’, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भरगच्च भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये हे बोलताच चहूबाजूंनी हार्दिक-हार्दिकचा जयघोष सुरू झाला. काही फुटांवर बसलेल्या हार्दिकने खुर्चीतून उठून चाहत्यांना अभिवादन केलं. काही महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंड्याला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने हार्दिकची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. पाच जेतेपदं मिळवून देणाऱ्या लाडक्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर केल्यामुळे चाहते संतापले आणि हार्दिकवर सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष मैदानात भयंकर टीकेला सामोरं जावं लागलं. संपूर्ण हंगाम हार्दिकला हा त्रास सहन करावा लागला. त्याच वानखेडे मैदानावर गुरुवारी हार्दिक-हार्दिक असा जयघोष पाहायला मिळाला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिकने याचा उल्लेख केला होता. सहा महिने माझ्या आयुष्यात बरंच काही झालं. माझ्यावर अन्याय झाला पण मी काही बोललो नाही.

हार्दिकने एक्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. हार्दिकने लिहिले, भारत हे माझं विश्व आहे. प्रचंड प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी अतिशय मनापासून आभारी आहे. हे संस्मरणीय क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. पाऊस असूनही हजारोंच्या संख्येने तुम्ही आम्हाला भेटायला आलात, तुमचे मनापासून आभार. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्याबरोबर विजयाचा आनंद साजरा करता येणं आमच्यासाठी खास क्षण आहे. आपण सगळे विश्वविजेते आहोत. १४२ कोटी आपण विजेते आहोत. मुंबई, थँक्यू, भारत-थँक्यू यू.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये हार्दिकने शेवटचं षटक टाकलं. दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूत १६ धावांची आवश्यकता होती. हार्दिकने त्या षटकात मिलरला बाद केलं. काही षटकं आधी हार्दिकने अतिशय धोकादायक अशा हेनरिच क्लासनला बाद केलं होतं. हार्दिकने फायनलमध्ये तीन महत्त्वपूर्ण विकेट्स पटकावल्या.