Rishabh Pant Came To Bat Despite Having Injury: भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचं कौतुक करावं तितकं कमी आहे. क्रिकेटमध्ये फलंदाज दुखापतग्रस्त झाल्यानंतर फलंदाजीला येणं टाळतात. कारण त्याचा परिणाम वैयक्तिक कामगिरीवर आणि खेळाडूच्या दुखापतीवर होऊ शकतो. पण ऋषभ पंतने पायाला गंभीर दुखापत असूनही फलंदाजीला येण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे मैदानात येताच क्रिकेट चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. सामन्यातील पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना ख्रिस वोक्स आणि साई सुदर्शनची जोडी जमली होती. त्यावेळी ख्रिस वोक्सचा वेगवान चेंडू ऋषभ पंतच्या उजव्या पायाच्या बोटाला जाऊन लागला. त्यामुळे बोट फ्रॅक्चर झाला आणि रक्तही येत होतं. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं. वेदना होत असलेला पंत रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला. त्यानंतर त्याच्या दुखापतीवर उपचार करण्यात आले. माध्यमातील वृत्तानुसार, त्याला कमीत कमी ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे ऋषभ पंत काही मैदानावर परतणार नाही, आता भारतीय संघाला १० फलंदाजांसह खेळावं लागणार अशी चर्चा रंगली होती. पण आयुष्यातील सर्वात मोठ्या अपघातातून सुखरूप बाहेर पडलेला पंत इतक्या छोट्या दुखापतीमुळे मैदान सोडून जाईल, हे गणित जुळत नव्हतं. त्यामुळे वेदना होत असतानाही तो दुसऱ्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर ऋषभ पंत भारतीय संघाची जर्सी परिधान करून ड्रेसिंग रूममध्ये दिसला. यावरून अंदाज वर्तवण्यात आला की, पंत फलंदाजीला येऊ शकतो. त्यानंतर बीसीसीआयने पंतच्या खेळण्याबाबत अधिकृत माहिती दिली. बीसीसीआयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, ” ऋषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये परतला आहे. तो यष्टीरक्षण करू शकणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करताना दिसेल. तर संघाला गरज भासल्यास तो फलंदाजीसाठी उपलब्ध असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघाला गरज असल्यास ऋषभ पंत फलंदाजीला येणार, हे स्पष्ट झालं होतं. पण कितव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार हे स्पष्ट झालेलं नव्हतं. दरम्यान दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर बाद होऊन माघारी परतल्यानंतर, ऋषभ पंत हातात बॅट घेऊन मैदानात येताना दिसला. आधी सपोर्ट घेऊन तो पायऱ्या उतरताना दिसला. त्यानंतर लंगडत क्रिझपर्यंत पोहोचला. हे पाहून क्रिकेट चाहत्यांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. पायाला दुखापत झालेली असतानाही त्याच्या फलंदाजीत कुठलाही बदल झालेला नाही. तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला. यासह गरज असताना त्याने पळून १ धाव देखील घेतली.