Suryakumar Yadav Jersey : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी २० सामना सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे खेळवला गेला. या सामन्यात विंडीजने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी निष्प्रभ ठरली. संपूर्ण भारतीय संघ १९.४ षटकांमध्ये केवळ १३८ धावांवर गुंडाळला गेला. या सामन्यानंतर भारताच्या पराभवापेक्षाही दुसऱ्याच एका गोष्टीची चर्चा जास्त रंगली, ती म्हणजे सूर्यकुमार यादवने घातलेल्या जर्सीची!

वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिले. पहिल्या टी २० सामन्याप्रमाणे या सामन्यातही कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमार यादवसह सलामीला उतरला. मात्र, सूर्यकुमार यादवने मैदानात पाऊल टाकताच मैदानावर जोरदार चर्चा सुरू झाली. कारण, सलामीला येणाऱ्या सूर्यकुमार यादवने गोलंदाज अर्शदीप सिंगची क्रमांक दोनची जर्सी घातली होती. सोशल मीडियावर तर अल्पावधीतच याबाबत जोरदार चर्चा झाली.

विशेष म्हणजे दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. वॉर्नर पार्क येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार होता. मात्र, अचानक या वेळेमध्ये बदल करण्यात आला. नवीन बदलांप्रमाणे भारतीय वेळनुसार रात्री ११ वाजता सामना सुरू झाला. लॉजिस्टिक समस्यांमुळे सामन्याला विलंब झाला होता.

हेही वाचा – IND vs WI 2nd T20 : ओबेड मॅकॉयच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण; दुसऱ्या सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

याबाबत वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने एक निवेदन जारी केले होते. “क्रिकेट वेस्ट इंडीजच्या (सीडब्ल्यूआय) नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीमुळे, त्रिनिदादहून सेंट किट्समध्ये संघाचे महत्त्वपूर्ण सामान येण्यास लक्षणीय विलंब झाला. परिणामी, दुसरा गोल्डमेडल टी २० चषकातील सामना दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहे (भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता). चाहते, प्रायोजक, प्रसारण भागीदार आणि इतर सर्व भागधारकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त करत आहोत,” असे निवेदन वेस्ट इंडीज क्रिकेटने प्रसिद्ध केले होते. हेच कारण होते की, सूर्यकुमार यादवला अर्शदीप सिंगची जर्सी घालून मैदानात उतरावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या लॉजिस्टिक समस्यांमुळे सामन्याला उशीर झाला, त्यामध्ये सूर्यकुमार यादवचेही सामान अडकले होते. त्यामुळे त्याला ऐनवेळी अर्शदीप सिंगची जर्सी घालून खेळावे लागले. याआधी वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही अशी परिस्थिती उद्धभवली होती. अष्टपैलू दीपक हुडाने प्रसिद्ध कृष्णाच्या जर्सीवर टेप लावून ती वापरली होती.