‘रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी प्रकारात खेळत नाहीत. ट्वेन्टी२० प्रकारातही खेळत नाहीत. फक्त वनडे प्रकारात खेळणार आहेत. वनडे सामन्यांची संख्या एकूणातच कमी झाली आहे. अशा परिस्थितीत या दोघांचा फॉर्म आणि फिटनेस निवडसमितीने कसा तपासला’, असा सवाल भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि माजी निवडसमिती प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी केला आहे. ‘या दोघांचीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली आहे. याचा अर्थ निवडसमितीने या दोघांचा फॉर्म आणि फिटनेस तपासला असावा पण कसं हे कळलेलं नाही’, असं वेंगसरकर यांनी मिड डे शी बोलताना सांगितलं.

‘रोहित आणि विराटच्या करिअरचा निर्णय निवडसमितीच्या हाती आहे. रोहित आणि विराट हे दोघेही मोठे खेळाडू आहेत. गेली अनेक वर्ष भारतीय संघाच्या विजयात फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्यांचं मोलाचं योगदान आहे. पण तुम्ही केवळ एकाच प्रकारात खेळत असाल तर निवडसमितीने योग्य निर्णय घ्यावा. त्यांचा फॉर्म कसा आहे, फिटनेस कसा आहे हे कसं कळणार कारण ते केवळ एकाच प्रकारात खेळतात. शेवटचा सामना खेळल्याला अनेक महिने झालेले असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांचा फॉर्म-फिटनेस समजून घेणं कठीण आहे’, असं वेंगसरकर म्हणाले.

‘वनडेत कामगिरी दमदार असल्यामुळे त्या दोघांनी या प्रकारात खेळत राहणं पसंत केलं असावं. भारतीय क्रिकेटला त्यांचं योगदान अतुलनीय असं आहे. आता गोष्टी निवडसमितीच्या हातात आहेत. या दोघांचा विचार करून पुढे जायचं की नव्या खेळाडूंना संधी द्यायची हे निवडसमितीला ठरवायचं आहे. नवे खेळाडू तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. भारतीय क्रिकेटचा ते कसा विचार करतात हे पाहणं उत्सुकतेचं आहे’, असं वेंगसरकर म्हणाले.

वेंगसरकर यांच्याप्रमाणेच माजी कर्णधार आणि लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनीही निवडसमितीच्या भूमिकेबाबत परखड मत व्यक्त केलं होतं. ‘पुढील दोन वर्षात भारतीय संघ किती वनडे सामने खेळणार आहे हे पाहायला हवं. वर्ल्डकपसाठी तयारी म्हणून हंगामात ७-८ वनडे खेळून होणार नाही. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या खेळाडूंना छोट्या मालिकांद्वारे फारसा सराव मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय सामना नसेल तेव्हा या दोघांनी विजय हजारे स्पर्धेत खेळायला हवं. जेणेकरून वनडे मालिकांसाठी ते फिट राहू शकतील’,असं गावस्कर म्हणाले.

२०२७ वर्ल्डकपसाठीच्या संघात रोहित-विराट असतील अशा नियोजनाच्या चर्चा होत्या. मात्र या वर्ल्डकपवेळी रोहित ४० वर्षांचा असेल तर विराट ३७. ही आकडेवारी लक्षात घेता वनडे संघाची धुरा शुबमन गिलकडे देणं योग्य आहे असं वेंगसरकर म्हणाले. तिन्ही प्रकारात त्याचा खेळ चांगला होतो आहे. त्याच्याकडे नेतृत्वक्षमता आहे.