शारजा : बाद फेरीचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये झगडणाऱ्या पंजाब किंग्ज संघाशी सामना करणार आहे. गुणतालिकेत तळाला असलेल्या या दोन संघांमधील झुंज रंगतदार ठरू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सकडून स्पर्धेमधील सातवा पराभव पत्करला. खात्यावर फक्त दोन गुण जमा असलेल्या हैदराबादची वाटचाल आव्हानात्मक ठरणार आहे. दुसरीकडे, पंजाबच्या खात्यावर ९ सामन्यांतून ६ गुण जमा आहेत. अमिरातीत पहिला विजय दृष्टिपथास असताना कार्तिक त्यागीच्या अखेरच्या षटकात हाराकिरी पत्करल्यामुळे पंजाबने राजस्थान रॉयल्सकडून दोन धावांनी पराभव पत्करला.

सनरायजर्स हैदराबाद

पहिल्या टप्प्यात सर्वाधिक धावा नावावर असणाऱ्या जॉनी बेअरस्टोची माघार आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा हरवलेला सूर यामुळे हैदराबादला दिल्लीकडून हार पत्करावी लागली. केन विल्यम्सन, मनीष पांडे, वृद्धिमान साहा, केदार जाधव, अब्दुल समद हे फलंदाजसुद्धा अपयशी ठरल्याने हैदराबादला फक्त १३४ धावाच करता आल्या. फिरकीपटू रशीद खानवर त्यांच्या फिरकीची धुरा आहे.

पंजाब किंग्ज

देशी-विदेशी खेळाडूंचा समतोल भरणा असतानाही पंजाबच्या कामगिरीत सातत्याचा तसेच कर्णधार, प्रशिक्षक आणि अंतिम ११ जणांचा चमू यात स्थर्याचा अभाव आहे. फलंदाजीत के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल यांचे वर्चस्व टिकून आहे. राजस्थानविरुद्धही या जोडीने ११.५ षटकांत १२० धावा केल्या. पण उर्वरित फलंदाजांना या भक्कम पायावर विजयाचा कळस चढवता आला नाही. सामन्याचा निकाल पालटू शकणाऱ्या ख्रिस गेलला विश्रांती देण्यात आली होती. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पाच बळी घेणारा अर्शदीप सिंग यांच्यावर पंजाबच्या गोलंदाजीची भिस्त आहे.

’  सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा. पासून

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी,

सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad punjab match ipl cricket ssh
First published on: 25-09-2021 at 01:46 IST