पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्यांदा प्रसारमाध्यमांसमोर आलेला आहे. India Today या वृत्तवाहिनीशी बोलताना शमीने पत्नीच्या आरोपांवर आपली प्रतिक्रीया दिली. “माझ्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये जराही तथ्य आढळलं तर मी बिनशर्त माफी मागायला तयार आहे.” हा माझ्या वैयक्तीक आयुष्याशी निगडीत प्रश्न आहे. माझी क्रिकेट कारकिर्द संपवण्यासाठी कोणीतरी हे षडयंत्र रचल्याच शमीने पुन्हा एकदा बोलून दाखवलं.

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने, शमीचे अन्य तरुणींसोबत शाररिक संबंध असल्याचा दावा केला होता. आपल्या फेसबूक वॉलवर हसीन जहाँने मोहम्मद शमीच्या फेसबूक अकाऊंटवरील संभाषणाचे काही तपशील व फोटोग्राफ शेअर केले होते. याचसोबत प्रसारमाध्यमांशी बोलताना हसीन जहाँने शमीने आपल्याला मारहाण केल्याचाही आरोप केला होता. मात्र शमीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हा प्रकार आपल्याविरोधात रचण्यात आलेलं षडयंत्र असल्याचं म्हटलं होतं.

अवश्य वाचा – मोहम्मद शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध; पत्नीकडून फेसबुकवर पोलखोल

“माझ्यात आणि हसीन जहाँमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नाहीयेत. माझी क्रिकेट कारकिर्द बिघडवण्यासाठी माझ्याविरोधात हे षडयंत्र रचलं जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परत आल्यानंतर मी आणि माझ्या पत्नीने एकत्र होळीही साजरी केली. यानंतर मी देवधर चषकाच्या सामन्यासाठी धर्मशाळाला रवाना झालो.” ही बाब माझ्या खासगी आयुष्याशी निगडीत असल्यामुळे दोन्ही घरच्या मोठ्या व्यक्ती यात एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील आणि लवकरच या प्रकरणावर पडदा पडेल असा आत्मविश्वासही शमीने व्यक्त केला.

अवश्य वाचा – माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे- मोहम्मद शमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्नीच्या आरोपांनंतर बीसीसीआयने मोहम्मद शमीचा वार्षिक करार राखून ठेवला होता. जोपर्यंत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला जात नाही तोपर्यंत शमीचा करार राखून ठेवण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – मोहम्मद शमीचे तरुणींसोबत अनैतिक संबंध असल्याचा पत्नीचा आरोप, बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार राखून ठेवला